राज्यभरात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन पुकारलंय. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे बंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष केली होती. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे हे सातत्याने त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे काम करीत आहेत. भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्यासंबंधातील भूमिकेशी आपण अजिबात सहमत नाही,” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

“राज ठाकरे अंगावर भगवा रंग घेऊन…”, भोंग्यांच्या वादावरून रामदास आठवलेंनी सोडलं टीकास्त्र

पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरे कधीच बाळासाहेब ठाकरेंना कॉपी करू शकत नसल्याचं म्हटलंय. “राज ठाकरे हे कधीच बाळासाहेबांची कॉपी करू शकत नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं, मशिदीवरील भोंगे काढा अशी भूमिका कधी बाळासाहेबांनी घेतलेली नव्हती. त्यांनी नेहमी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता. फक्त दहशतवादी मुस्लिमांना त्यांचा विरोध होता. त्यामुळे बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोप्प काम नसून राज ठाकरे कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकत नाही,” असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, “संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. मध्येच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी करीत मशिदीसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा वाचण्याची भूमिका घेतली आहे  हा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे. धर्माचा बुरखा घालून कोणी संविधानाविरोधात काम करीत असेल तर आमचा त्यांना विरोध असेल,” असे आठवले यांनी सांगितले.