Raj Thackeray on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकवर केलेल्या टीकेवर विधानसभेत उत्तर दिलं. यावरून राजकारण करणाऱ्यांना जाब विचारत त्यांनी कारवाईचा इशारा दिला. यावेळी ते सभागृहात हिंदीतून निवेदन सादर करत होते. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज ठाकरे मनसेच्या रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

“मुख्यमंत्री आहेस ना तू? वाक्य संपल्या संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे… कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिंदीत बोलतात? कोणासाठी? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल. बघून घेईन”, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

“स्वतःच्या अंगावर आलं की राजकारण?”

“आमच्या सरकारला हिंदीची आस्था. कालचं विधानसभेतलं मुख्यमंत्र्यांचं भाषण. मिसिंग लिंकवर म्हणे दरड कोसळली. त्याचं राजकारण करू नका म्हणाले. त्यावर बोलले की राजकारण? मग इतके वर्षे आपण काय करत होतात? दुसऱ्यांचं सरकार होतं, तेव्हा तुम्ही काय करत होतात? तेव्हा जी आंदोलने झाली ते राजकारण नव्हे? स्वतःच्या अंगावर आलं की राजकारण, असं कसं होईल?”, असं म्हणत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

मुख्यमंत्र्यांची केली मिमिक्री

पुढे देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करत म्हणाले, “एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान करू नका. लोक मिसिंग लिंकवर बोलत आहेत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करत आहेत? केंद्राच्या कोणत्या गोष्टीवर बोललात की तुम्ही देशविरोधी. केंद्राची कामे आहेत ही, त्यात देशाचा संबंध काय? मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला? लोकांनी प्रश्नही विचारू नये? काय चाललंय हे?”

“जे काही घमासान सुरू आहे पक्षात, ते फक्त पाहात राहा. शहरांचा विचका झाला आहे. ज्याला हे विकास म्हणत आहेत. या विषयावर मी इतके वर्ष बोलतोय. आपल्याकडे टाऊन प्लानिंग होत नाही. बघावं तिकडे इमारती उभ्या राहत आहेत. माझी विनंती मुख्यमंत्र्‍यांना सर्व बांधकामे बंद करा, ब्रीज आणि फ्लायओव्हर म्हणजे विकास नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.