Raj Thackeray Ladki Bahin Yojna : “राज ठाकरे हे भाजपाच्या हातचं बाहुलं झाले आहेत”, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. राज ठाकरे हे मराठी मतदारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. दानवे म्हणाले, “राज ठाकरे हे इतरांना लाडका भाऊ आणि लाडकी बहीण सांभाळण्याचा सल्ला देत असले तरी त्यांना लाडक्या भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या अधिक प्रिय आहेत”. राज ठाकरे यांनी विधानसभेला २५० जागांसाठी तयारी सुरू केली आहे. त्यावर दानवे म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा मराठी माणसाची मतं फोडण्यासाठी मनसेचा वापर करू शकते.”
अंबादास दानवे म्हणाले, “लाडका भाऊ, लाडकी बहीण असं करणाऱ्याला लाडक्या सुपार्या जास्त प्रिय दिसतात. आपण त्यांचं (राज ठाकरे) गेल्या १० ते २० वर्षांमधलं राजकारण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी केवळ सुपार्यांचं राजकारण केलं आहे. त्यामुळे त्यांना सुपारी घेणारे आणि देणारे अधिक प्रिय आहेत. त्यातच त्यांनी संघटना फोडण्याचे पाप आपल्या डोक्यावर घेतलं आहे आणि आता निवडणूक आल्यावर लाडका भाऊ, लाडकी बहीण आठवू लागली आहे. राज्य सरकारचं ही तसंच आहे. आता ते लाडका भाऊ, लाडकी बहीण घेऊन बसले आहेत. खरंतर त्यांना भाऊ किंवा बहीण प्रिय नाही. त्यांना केवळ त्यांची सत्तेची खुर्ची प्रिय आहे. म्हणून तर ते लोक या सगळ्या योजना घेऊन येत आहेत.”
राज ठाकरेंचा पक्ष २५० जागा लढवू शकत नाही : दानवे
राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेला २५० जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “कोण किती जागा लढतं, हे महत्त्वाचं नाही कोण किती जागा लढवून निवडून आणतं ते महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीला तर त्यांनी महायुतीला बिनिशर्त पाठिंबा दिला होता. आता ते २५० जागा लढवणार म्हणजे ते महायुतीच्या मदतीसाठी हे सगळं करणार की आणखी काही कारण आहे? खरंतर संपूर्ण महाराष्ट्रात २५० जागा पूर्ण ताकदीने लढू शकेल असा कोणताही पक्ष नाही आणि राज ठाकरेंचा पक्ष तर मुळीच नाही.”
हे ही वाचा >> “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं
राज ठाकरे मराठी माणसाचा गळा घोटत आहेत : दानवे
मनसेवर मराठी मतदार फोडण्याचे आरोप होत आहेत. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, भाजपाने नेहमीच मनसेचा वापर मराठी मतदार फोडण्यासाठी केला आहे. शिवसेनेचा मराठी मतदार फोडण्यासाठी ते मनसेचा वापर करत आहेत. पूर्वी मराठी माणसाची जी एकजूट होती ती राज ठाकरे यांच्यामुळे तुटली. मुंबईत गुजराती लोक एकत्र येतात मात्र मराठी मतदारांमध्ये फूट पाडण्याचं पाप कोणी करत असेल तर ते मनसे आणि राज ठाकरे यांनी केलं आहे. परंतु, मी यासाठी मनसेला जबाबदार धरणार नाही. याला भाजपा कारणीभूत आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या हातचं बाहुलं बनून मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने गाळा घोटू लागले आहेत आणि आता विधानसभा निवडणुकीतही ते तेच करणार असल्याचं दिसतंय.
© IE Online Media Services (P) Ltd