Raj Thackeray on PM Modi Remarks: “जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ज्याप्रकारची भाषा वापरण्यात आली, ती अयोग्य होती. हे आम्हाला मान्य आहे. कुणाच्याही बाबतीत अशाप्रकारची खालची भाषा वापरली जाऊ नये, हे मला १०० टक्के मान्य आहे. मला फक्त पंतप्रधानांना एवढेच सांगायचे आहे की, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या शुक्रवार रात्रीच्या व्हिडीओला उत्तर देताना म्हटले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी राज ठाकरे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत जंतर-मंतरवर त्यांच्याबाबत आणि त्यांच्या आईबद्दल जी आक्षेपार्ह भाषा वापरली गेली, त्यावरून आक्षेप घेतला. तसेच ज्या खोडकर मुलांनी हे कृत्य केले, त्यांना मी माफ करतो, असेही म्हटले. त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते.
याच विषयावर बोलत असताना राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून आमच्यापर्यंत तुमची ट्रोलर्सची टीम कोणत्या भाषेत ट्रोलिंग करते, तेही एकदा पाहा. महाराष्ट्रातील अनेक कलाकार काही बोलायला घाबरतात. प्रत्येक राज्यात त्यांनी अशा टीम बसवल्या आहेत. त्यांनाही शिव्या देऊ नका, असे सांगावे.”
‘दुसऱ्यांनाही आई असते’
“गेल्या १२ वर्षांत ट्रोलिंगची सुरुवात झाली. तुम्ही जे पेरले तेच तुमच्या अंगाशी आले आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या गेल्या. ते चुकीचेच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुमच्या पक्षातल्या लोकांना तुम्ही सांगितले पाहिजे. त्यांनीही मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुम्ही जंतर-मंतरवरच्या मुलांना माफ केले, असे सांगता. पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केले, त्याची माफी कोण मागणार?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
विद्यार्थी चळवळीबाबत काय म्हणाले?
“मी ज्यावेळी विद्यार्थीदशेत होतो. त्यावेळचे विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न वेगळे होते. आताचे विषय वेगळे आहेत. आताचे तरुण वेगळे आहेत. आम्ही टेलिग्रामपासून ते इन्स्टाग्रामचा काळ पाहिला. आताची जेन-झी पिढी आहे, त्यांचे म्हणणे काय आहे? हे समजून घ्यायला हवे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातही जेन-झी आहेत. त्यांच्या अपेक्षा काय आहेत? त्यांना काय हवे आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेनेही याचा शोध घेतला पाहिजे”, असे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केले.
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
लहानपणी आई-वडील सांगायचे रात्री झोपताना डोक्याला तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका व्यक्तीने आयुष्यभर केसांना तेल चोळले, पण बुद्धी काही आली नाही, असे सांगून राज ठाकरे यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
“राज्याचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील काय बोलतात, हे त्यांचे त्यांना तरी कळते का? जग कुठे चालले आहे आणि आपण काय बोलतो? महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री दगडावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक करणार आहेत. मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत”, असे म्हणत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
“या माणसाला ज्ञान मिळावे म्हणून कोल्हापूरकरांनी त्यांना पुण्यात पाठवले. इथेही त्यांचे काही नाही झाले. असे शिक्षण मंत्री म्हटल्यावर जेन-झींचा पारा चढणार की नाही चढणार?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
