Raj Thackeray on Vishwas Nangre Patil : धडक कार्यपद्धती आणि वक्तृत्व कलेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली होताच नवीन वाद उद्भवला. सकल हिंदू समाजाच्या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. यावरून सर्व स्तरांतून टीका होत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांचा समाचार घेतला. त्यांनी याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट लिहिली आहे.
हिंदू संमेलने राजकीयच
“आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत. आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल”, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
तर राजीनामा द्या
“आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल” अशी टीकाही त्यांनी केली.
नांगरे पाटलांच्या वर्दीचा खाकी रंग संघाच्या खाकीचा
“नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं. नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन (अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं) करताना आपण काय चुकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय?” असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
“२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“आमदार, खासदार यांना ‘आमच्याकडे या’ म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे? नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतु नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात, तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका!” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
