Raj Thackeray’s meeting with Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अनियमिततेविरोधात आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी पेठेतील एस. एम. जोशी पूल येथे आमदार रोहित पवार यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज ठाकरे यांनी आंंदोलनस्थळी भेट देऊन स्पर्धा परीक्षार्थ्यांशी संवाद साधला. सद्यस्थितीचे भान देतानाच ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवरही टीका केली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावरच त्यांनी आज सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.”
“स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसंच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
…तर या चांगल्या बातमीची हजारो विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत – रोहित पवार
यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाचे संपूर्ण शुद्धीकरण हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आणि जनभावना असून हजारो विद्यार्थी त्यासाठी गेल्या ९ दिवसापासून आंदोलन करत आहेत. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी केलेल्या शेवटच्या चर्चेत ७० हजार पदांच्या भरतीसह बाकी इतर मागण्या विद्यार्थ्यांच्यावतीने मान्य करवून घेतल्याच आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या झालेल्या चर्चेत ते सकारात्मक असतील आणि यातूनच मुख्यमंत्री ‘विवेक’ दाखवत अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी निर्णय घेणार असतील तर या चांगल्या बातमीची हजारो विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत. चांगली बातमी येईल, ही अपेक्षा..!
कोणाचेही पाय धरायला तयार – राज ठाकरे
“महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्या लागण्यासाठी कोणाचेही पाय धरावे लागले, तर त्यासाठी राज ठाकरे तयार आहे”, अशी भूमिकाही ठाकरे यांनी ५ ऑक्टोबर रोजी मांडली होती. “महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात गुंतला आहे. तरूण अभ्यास करत आहे, पण नशिबी पेपरफुटी येत आहे. तुम्हाला आलेला राग तात्पुरता असू नये; तो कायम राहिला पाहिजे. मात्र, वस्तुस्थिती आणि परिस्थिती ओळखून आंदोलनाची दिशा ठरवा. भलत्या गैरसमजात राहू नये. आरक्षण हवे म्हटले जाते, पण सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. जे काही सरकारी आहे, ते खासगी केले जात आहे. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील उमेदीचा काळ सरकारी धोरणांमुळे वाया जात आहे. तरुणांना केवळ गृहित धरले जात आहे”, असंही ते म्हणाले होते.
