Raj Thackeray on DJ Banned : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना येणाऱ्या सण-उत्सवाच्या काळात कसं वागलं पाहिजे, काय भूमिका घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन केलं. तसंच, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डीजेबंदीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आज भाष्य केलं.
गणपती विसर्जनाला कसला आनंद होतोय?
राज ठाकरे म्हणाले, “डीजे बंदीवरून सध्या वाद चालू आहे. याबाबत मी कधीच भूमिका घेतली होती. कसले डॉल्बी वगैरे लावत आहात? कसले डीजे? आपल्या पारंपरिक पद्धतीने सण का साजरे होत नाहीयत?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “इतक्या श्रद्धेने गणपती घरी आणायचा. आणि विसर्जन करताना नाचता? कसला आनंद होतोय? यात कसला आनंद साजरा करताय? माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो. मुलांसाठी मी आणला. ज्यावेळी गणपती जातो तेव्हा ओकंबोकं वाटतं घर. उत्साह गेल्यासारखा वाटतं. वाईट वाटतं त्यावेळेला. मग वाईट वाटण्याऐवजी कसला उत्साह साजरा करताय?”
उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणतोय
“आपण उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणतोय का? आता इथे गोविंदाच्या वेळेला महिलांना व्यासपीठावर आणून नाचायचं. हे सर्व उत्तरेत चालतं. ते आपण महाराष्ट्रात आणतोय का? आपण त्यांना शिकवायचं की आपण त्यांचं घ्यायचं? कोण आहोत आपण? काय आहे महाराष्ट्राचा इतिहास? महाराष्ट्राने किती गोष्टी शिकवल्या? मध्यंतरी महाराष्ट्राचं रुप दाखवलं होतं, माणसं कशी होऊ गेली आपल्याकडे. हा महाराष्ट्र त्यांचं अनुकरण करतोय? सण कशाप्रकारे साजरा व्हायला हवा? आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरा केला पाहिजे”, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.
“या आवाजामुळे अनेकांचे डोळे, कान गेले. जरा तरी हृदयाचा त्रास असेल तर या आवाजाने माणूस मरू शकेल. कुठे आणून ठेवलाय आपण सण? टिळकांनी कशासाठी गणेशोत्सव सुरू केला? तुम्ही धर्मांमध्ये बेभान होऊ नये. उत्सव इथपर्यंत ठीक आहे. धर्मांधपणा खड्ड्यातच घेऊन जाणार. जे देश धर्माच्या नावाखाली उभे राहत होते, ते देश पुढे चालले आहेत आणि आपण मागे चाललो आहोत”, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
