Raj Thackeray on Balasaheb Thackeray Jayanti: “आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते, बाळासाहेब नाहीत ते बरंच आहे”, असे उद्विग्न विधान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना केले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “आजची परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यथित झाला असता. त्या माणसाला काय त्रास झाला असता. पूर्वी चावडीवर उभे राहून माणसांचे लिलाव चालायचे, आज त्याप्रमाणे महाराष्ट्रात लिलाव सुरू आहेत. आज सर्व जिल्ह्यात हेच सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर माझे बोलणे झाले. सध्याचे चित्र पाहून शिसारी आली. आज हे चित्र पाहायला माननीय बाळासाहेब नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट नाही.”
“बाळासाहेब ठाकरे हे पाहूच शकले नसते. त्यांनी शून्यातून गोष्टी उभ्या केल्या होत्या. बाहेरच्या पक्षात बघा. अनेक लोक असे दिसतील, ज्यांना बाळासाहेबांनीच उभे केले होते. मी ज्यावेळी बाहेर पडलो, ते माझ्यासाठी गोष्टी वेगळ्या होत्या. माझ्याबाबतीत पक्ष नाही तर घर सोडण्याचा विषय होता. पण त्यालाही २० वर्षांचा काळ लोटला आहे. अनेक गोष्टी मला उमजल्या, उद्धव ठाकरेंनाही अनेक गोष्टी उमजल्या असतील. ते आता सोडून द्या”, असे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या घटनेवर रोखठोक भाष्य केले.
“बाळासाहेब ठाकरे या विषयावर मला व्याख्यानच द्यायला आवडेल. त्या माणसाचे सर्व पैलू मला एकदा तुमच्यासमोर मांडायचे आहेत. आपण हत्तीची गोष्ट ऐकली असेल. त्याचे कान, शेपूट, सोंड प्रत्येक गोष्ट वेगळी वाटते. बाळासाहेब ठाकरे असेच होते. प्रत्येकाला ते वेगळे वाटत होते. तो माणूस कसा होता? हे जगाला कळलेच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला कळले नाही, तर तुम्हाला कुठून कळणार? पण जे होते, ते विलक्षण होते”, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.
‘…तर बाळासाहेब निश्चित व्यथित झाले असते’
राज ठाकरे यांनी यानंतर सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरेंसाठी केलेली पोस्ट वाचून दाखवली. त्यानंतर ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांनी या देशात हिंदूंना हिंदूच्या नावावर मतदान करण्यासाठी तयार केले. तोपर्यंत याची कल्पना भाजपालाही नव्हती. हा विचार बाळासाहेबांनी देशभरात फुंकला. त्यानंतर सर्वार्थाने यश मिळायला सुरुवात झाली. आज जर बाळासाहेब असते आणि हिंदुत्वाचा जो काही बाजार मांडून ठेवला आहे, तो त्यांनी पाहिला असता तर ते निश्चित व्यथित झाले असते.
