Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी मुंबईतल्या वरळी या ठिकाणी मनसेचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाबाबत भाष्य केलं. शिवाय भाजपाचे नेते भेटायला येतात त्यावर त्यांना काय नका येऊ असं सांगणार का? असा सवालही त्यांनी केला. चंद्रकांत पाटील यांचा एक किस्सा सांगत राज ठाकरेंनी त्यांच्या खुमासदार शैलीत भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

काय म्हणाले राज ठाकरे?

“विधानसभा निवडणूक निकालातले अनेक असे निर्णय आहेत ज्यावर विश्वास बसतच नाही. निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पडलेल्यांचं काय घेऊन बसलोय आपण? निवडून आलेले रोज रात्री बायकोला सांगतात चिमटा काढ म्हणून. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले. ते सातवेळा ७० ते ८० हजार मताधिक्यांनी निवडून यायचे त्यांचा १० हजार मतांनी पराभव झाला. कदाचित अनेक लोक बोलतील राज ठाकरे पराभूत झाल्याने हे बोलत आहेत, मी नाही संपूर्ण महाराष्ट्र बोलतो आहे. जे निवडून आले आणि सत्तेत आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांनाही शॉक बसला आहे.”

भाजपा नेते म्हणतात चहा प्यायला घरी येतो त्यांना काय सांगणार?

“राजकारणाचा सगळा चिखल झाला आहे, त्यात तुम्ही जागरुक राहिलं पाहिजे. अनेक लोक मला सांगतात, भाजपाच्या नेत्यांना भेटायला नको. भेटायला नको? समोरचा माणूस म्हणाला चहा प्यायला घरी येतो तर त्याला काय सांगायचं? घरीच चहा पी. तुम्हाला कुणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल? मला जेव्हा कुणीही भेटायला येतं तेव्हा मी तुम्हाला विकत नाही. मी मराठीचा बाणाही बोथट करत नाही. मध्यंतरी नाशिकला होतो, समोरुन चंद्रकांत पाटील आले. नमस्कार वगैरे करुन म्हणाले मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. मला सांगा ही परिस्थिती तुमच्यावर आली. तर काय कराल? चहा कशाला प्यायचा? कशाला घरी येता? असं सांगू का? एक माणूस समोरुन सांगतोय की चहा प्यायला येतो तर येच म्हणणार.” असं राज ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी ती कृती का केली अजून माहीत नाही-राज ठाकरे

राज ठाकरेंनी या पुढचाही किस्सा सांगितला. “चंद्रकांत पाटील नाशिकच्या भेटीनंतर मुंबईत मला भेटायला आले. बरं हे बाहेर जाऊन वेगळे बोलतात. बरेच दिवस आपण भेटलो नाही वगैरे एवढंच असतं. मुंबईत चंद्रकांत पाटील आले, माझ्याशी चर्चा केली. चहा-पाणी झाल्यावर बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं भेटीत काय झालं? तर काय सांगावं? सहज भेट होती, सदिच्छा भेट होती सांगावं ना. चंद्रकांत पाटील यांनी खांदा उंच करुन शक्ती दाखवल्यासारखी कृती केली. ती त्यांनी का केली? मला अजूनही कळलेलं नाही. या भेटीनंतर पत्रकार मला विचारत होते त्यांनी असं का केलं? मी म्हटलं म्हणजे काय? आम्ही दोघंही एकमेकांना तोच प्रश्न विचारत होतो. बाई आणि बुवा एकत्र भेटले की लफडंच असलं पाहिजे असं पत्रकारांना वाटतं. पण नॉर्मलही भेटू शकतात ना. आधी राजकारणात सगळे एकमेकांना भेटत होते. पक्षाच्या धोरणांमध्ये तडजोड होत नव्हती. आत्ताही तसं नाही. चंद्रकांत पाटील यांनी ती कृती का केली? मला माहीत नाही. काय मला त्यांनी कडेवर घेतलं होतं की मी कोपरात अक्रोड ठेवून त्यांना फोडून दाखवला. काय मला काहीच कळलं नाही. असं राज ठाकरे म्हणाले. एक लक्षात ठेवा, कुणीही भेटायला आलं तरीही पक्षाचं प्रेम आणि धोरण बाजूला ठेवणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray imp statement about bjp leaders who came to meet him also told chandrkant patil story with his action scj