महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढापाडव्या दिवशी शिवतीर्थावरून केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आणि या भाषणावर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील आल्या. त्यावर काल ठाण्यात झालेल्या मनेसेच्या उत्तरसभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. शिवाय, हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेतली. पंतप्रधआन मोदींचे कौतुक करताना उत्तर प्रदेशातील विकासावर देखील भाष्य केलं. या पार्श्वभूमीवर मनसे ही भाजपाची सी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सुरू झाली आहे. या टीकेवर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

“राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे भाजपाची बी टीम असल्याचं खोटं महाविकास आघाडी आपल्या इको-सिस्टिमच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कधीही कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

खोटं पसरवण्यासाठी महाविकास आघाडीची इको सिस्टिम –

तसेच, “खोटं पसरवण्यासाठी महाविकास आघाडीने इको सिस्टिम सुरू केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते समान खोटं बोलून ते खरं कसं आहे हे जनतेला भासवून देण्याचा प्रयत्न या इको-सिस्टिमच्या माध्यमातून करत आहेत.”

हिंदुत्व हा भारतीय जनता पार्टीचा श्वास आहे –

“हिंदुत्वाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. परंतु, भाजपाला नव्याने घेण्याची गरज नाही, कारण सुरूवातीपासून भाजपाच तो प्रमुख मुद्दा राहिला आहे. आजतागयत हिंदुत्वाचे अनेक मुद्दे भाजपाने प्रखरपणे मांडले आहेत. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे.”

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? –

“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.