Raj Thackeray Maharashtra Din Latest Political News: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मुंबईत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचंदेखील उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याहस्ते करण्यात आलं. त्याआधी सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुबंईतील हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली. काही वेळानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील तिथे जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर राज ठाकरेंनी हुतात्मा स्मारकाची अवस्था आणि महाराष्ट्र दिनाबाबत मराठी जनांची अनास्था याबाबत खंत व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृक एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र दिनाबाबत राज्य सरकारकडून दाखवल्या जाणाऱ्या अनास्थेवरदेखील बोट ठेवलं. त्याशिवाय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा आपल्याला विसर पडत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा”, अशा उल्लेखानं सुरुवात केलेल्या या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी सविस्तर भाष्य केलं आहे.
सरकार फक्त औपचारिकता पार पाडतंय – राज ठाकरे
महाराष्ट्र दिन साजरा करताना सरकार फक्त औपचारिकता पार पाडण्याच्या आविर्भावात दिसतं, असा आक्षेप राज ठाकरेंनी घेतला आहे. “मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे. ती म्हणजे सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसाच महाराष्ट्र दिन हा आणखी एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता”, असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वरिष्ठांची खप्पामर्जी टाळण्यासाठी अनास्था?
दरम्यान, केंद्रातील नेतेमंडळींच्या राज्याच्या मनात संयुक्त महाराष्ट्राची सल असल्याचा दावा राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. “सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे? वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस सरकारला केला आहे.
“हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय”, असंदेखील राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“सरकारकडून अपेक्षापूर्ती नाहीच, पण लोकांना काय झालंय?”
या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी मराठी भाषिकांनाही आवाहन केलं आहे. “सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे. पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत”, अशी खंत राज ठाकरेंनी पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
“माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषिकांना साद घातली आहे.
