गुढीपाडव्यादिवशी झालेल्या सभेपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत. त्यानंतर काल ठाण्यामध्ये झालेल्या सभेनंतरही त्यांच्या भाषणाविषयीची चर्चा सुरूच आहे. या सभेच्या वेळी त्यांनी व्यासपीठावर तलवान म्यानातून काढून दाखवली. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यालाच मनसेने उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी उद्धवा अजब तुझे सरकार असं लिहिलं असून या व्हिडीओमध्ये अनेक नेते तलवारी हातात घेतलेले दिसत आहेत. यामध्ये सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्या तलवार घेतलेल्या फोटोंचा समावेश आहे. या व्हिडीओवर त्यांनी लिहिलं आहे की, उत्तरसभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर नौपाडा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद, मग ह्यांचं काय?
महाराष्ट्राच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंविरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यामधील सभेमध्ये राज यांनी स्टेजवरुन तलवार म्यानातून काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स अॅक्टचं उल्लंघन केल्याचा ठपका राज यांच्यावर ठेवण्यात आलाय. तलवार दाखविल्याप्रकरणी त्यांच्यासह सुमारे १० जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल; ठाण्यातील ‘उत्तर सभे’च्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांची कारवाई
राज ठाकरे काल साडेसातच्या सुमारास मूस रोडवरील सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा भगवी शाल आणि तलवार देऊन स्वागत करण्यात आलं. यानंतर राज यांनी म्यानातून तलवार बाहेर काढून ती उंचावून दाखवली. याच प्रकरणी आता ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नौपाडा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कायदा कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ व २५ प्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.