scorecardresearch

नकलाकार राज ठाकरे! ठाण्यातल्या सभेत ‘या’ नेत्यांच्या केल्या नकला; टोलेबाजी करत म्हणाले…

राज ठाकरे यांची नकला करण्याची शैली राज्याला ज्ञात आहेच. याच शैलीमध्ये भाषण करत त्यांनी आजच्या सभेतही अनेक नेत्यांवर टीका केली आहे.

गुढीपाडव्यादिवशी झालेल्या सभेपासूनच राज ठाकरे यांची जोरदार चर्चा राज्यभरात सुरू आहे. मशिदींवरच्या भोंग्याबद्दल राज ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. आता आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांची ठाण्यात भव्य सभा झाली आणि जोरदार चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांची नकला करण्याची शैली राज्याला ज्ञात आहेच. याच शैलीमध्ये भाषण करत त्यांनी आजच्या सभेतही अनेक नेत्यांवर टीका केली आहे. अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्या नकला राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला आहे. नकला करत त्यांनी या नेत्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील असा करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.


जयंत पाटलांची नक्कल करताना राज ठाकरे म्हणाले, “जंत पाटलांना काहीही सांगा, चकित चंदू. एकदा मी सांगितलं बेहरामपाड्यात जाऊन बघा. गंभीर परिस्थिती आहे. तर म्हणे खरं की काय, मला काही माहितीच नाही. सतत चेहऱ्यावर आश्चर्य असतं. संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार? अरे येऊन बघा, हा काय संपलेला पक्ष आहे का? जयंत पाटील म्हणतात, हा विझलेला पक्ष आहे. जंतराव, हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. माझ्या अक्षरावर थोडं इकडे-तिकडे झालेलं असेल तर सांभाळून घ्या. हे काय मला सांगतात. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कुणी हुंगून विचारत नाहीत. मला सांगतात यांचे आमदार कुठे गेले. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडून येणाऱ्या उमेदवारांची मोळी आहे. त्याची दोरी फक्त शरद पवार आहेत. ही माणसं दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेली, तरी निवडून येतील.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे – राज ठाकरे


तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांची नक्कल करताना राज ठाकरे म्हणाले, “आमचे लाडके अजित पवार का म्हणतायत बघा. त्यांचा आवडता शब्द आहे पठ्ठ्या. यांना काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का. याच्याआधी म्हणे झोपा काढत होतात का? अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय. तुमच्या माहितीसाठी फक्त ३ व्हिडीओ आणले आहेत. मी याआधीही बोललो होतो. पण त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही. त्यानंतर त्यांना कूSSS असा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही.”

आणखी वाचा – Raj Thackeray Thane Speech : “शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने…”, राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा!


जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्यांची नक्कल केली आहे. या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मुंब्र्यातून अटक केलेल्या अतिरेक्यांची यादी वाचून दाखवली. या भागातून आव्हाड निवडून येतात, असं म्हणत राज ठाकरे म्हणतात,”यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला.आता तुम्ही म्हणाल, वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार? मी कुठे म्हटलो होतो की अतिरेकी सापडणार नाहीत? या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray mimicry of ajit pawar jitendra awhad jayant patil vsk