नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला. येत्या १५ ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांना यूपीआयद्वारे २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे पेमेंट स्वीकारताना ०.४ टक्के शुल्क भरावं लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) असं संबोधले जाणारे हे शुल्क प्रति व्यवहार जास्तीत जास्त ३०० रुपयांपर्यंत मर्यादित असणार आहे.

या निर्णयाचा सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होणार नसल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र, यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरकारच्या या निर्णयावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. ‘सरकारने डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय अडकला आहे’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. याबाबत त्यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटलं?

“दारावरची टकटक! केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ अर्थात सोप्या भाषेत यूपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही, पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, ‘डिजिटल सापळा’ लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत यूपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच ‘डिजिटल सापळ्यात’ पकडलं”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

“मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार आणि त्याची सुरुवात झाली आहे. सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी यूपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो, यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

“ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केली ०.४ टक्के एमडीआर लागू होणार? आणि सरकारचं म्हणणं आहे की हा भार व्यापाऱ्यांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का? उत्तर आहे अजिबात ‘नाही'”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘मोदी आता परदेशात गेल्यावर एमडीआर लावला हे सांगणार का?’

“पुन्हा सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही म्हणून अन्यथा त्यावर पण त्यांना १८ टक्के जीएसटी लावायचा आहे. त्यामुळे त्यांनी या एमडीआरवर पण जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशांत जाऊन यूपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेंव्हा परदेशांत जातील तेंव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

“काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं आहे म्हणून. मला त्याबद्दल माहित नाही. पण हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असं सरकार ठाम सांगू शकेल? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वतःची तिजोरी भरून काढायला वापरला”, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

‘प्रत्येक भारतीय सरकारच्या डिजिटल सापळ्यात अडकला’

“प्रश्न चार पैसे किंवा चाळीस रुपयांचा नाही. प्रश्न सरकारच्या हेतूचा आहे. नोटबंदी असेल किंवा डिजिटल पेमेंट व्यवहार असतील, यात सरकारचे हेतू कधीच स्वच्छ दिसले नाहीत. यूपीआय चालवण्याचा खर्च कोण करणार, याचा विचार व्यवस्था उभी करतानाच व्हायला हवा होता. जो केला नाही किंवा करायचा नाही असं आधीच ठरलं होतं. २०२२ ला अर्थ खात्याने असं स्वच्छ सांगितलं होतं. पण हे सांगताना मी म्हणलं तसं कधी तुमच्या खिशात हात घालायचा हे पण ठरलं होतं आणि दोन माणसांच्या व्यवहारांवर शुल्क लावत नाही आहोत असले भंपक युक्तिवाद सरकारने करू नये. तुम्ही डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एमडीआरचा निषेध नोंदवते. हे शुल्क भरण्यास व्यापाऱ्यांनी सपशेल विरोध करावा”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.