महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. महात्मा गांधी यांनी सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं आणि प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य दिलं. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

तसेच सध्याच्या काळात आंदोलनांकडे संशयाने पाहिलं जातं, संविधानिक संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा काळात सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्यासाठी गांधीजींच्या विचारांची खरी गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटलं?

“आज महात्मा गांधी यांची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या पुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्यासोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात महात्मा गांधी यांची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं आणि प्रश्न विचारणं हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ट्रोळ्या’ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

महात्मा गांधींनी देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती?

“आज आंदोलनांकडे संशयाने पाहिलं जातं, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी महात्मा गांधी यांची सर्वाधिक गरज आहे. महात्मा गांधी यांनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती? तर मला वाटतं, सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्या आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे महात्मा गांधी यांनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये आणि हेच महात्मा गांधी यांच्या शिकवणीचं सार आहे, म्हणून महात्मा गांधी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत, बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये. महात्मा गांधी यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.