Raj Thackeray Maharashtra Navnirman Sena: महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा २० वा वर्धापनदिन ९ मार्च २०२६ रोजी साजरा होत असून, या निमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना विशेष संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी १० मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू होत असल्याची घोषणा केली आहे.

रायगडावरून सदस्य नोंदणीला सुरूवात

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले की, ९ मार्च रोजी ते रायगड किल्ला येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करतील. रायगड हा शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असल्याने अशा पवित्र स्थळावरून मोहिमेला प्रारंभ करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज ठाकरेंचे आवाहन

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करताना स्पष्ट केले की, ही सदस्य नोंदणी केवळ पक्ष कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राला आकार द्यायची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या चळवळीत सहभागी करून घ्यावे. सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी असलेल्या नागरिकांनाही नवनिर्माणाच्या ध्यासाशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

कुठे केली जाणार सदस्य नोंदणी?

यावेळी सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केवळ पक्ष शाखांबाहेर स्टॉल्स लावण्यापुरते मर्यादित न राहता बाजारपेठा, शाळा, मंदिरे, कॉलेज, मैदानं आणि बागा यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उभारण्याचे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना पक्षाशी जोडण्याचेही त्यांनी सांगितले.

गुढी पाडव्याला कार्यकर्त्यांना संबोधित करणार

या मोहिमेत आकड्यांपेक्षा मराठी माणसाच्या भावना आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची तयारी महत्त्वाची असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दल लोकांच्या मनात किती नाराजी आहे, हेही या मोहिमेतून स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, १९ मार्च रोजी शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथे गुढी पाडवा निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेट होणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.