scorecardresearch

Raj Thackeray Uttar Sabha : “कसलं हिंदुत्व? जो फक्त दंग्यांमध्ये हिंदू होतो तो…”, ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंची चौफेर टोलेबाजी!

MNS Uttar Sabha Thane Live : पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं भाषण, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर केलेल्या टीकेनंतर अनक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

raj thackeray thane speech
राज ठाकरेंची ठाण्याती सभेत चौफेर टोलेबाजी!

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live Updates : राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर त्यांनी तोंडसुख घेतलं. शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, या सभेतून त्यांनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपाला फायदेशीर भूमिका घेतलीये का? मनसे भाजपाची बी टीम आहे का? अशी टीका केली जाऊ लागली होती.

या सर्व मुद्द्यांना राज ठाकरे आज उत्तर देणार असल्यामुळेच या सभेला ‘उत्तरसभा’ असं नाव मनसेकडून देण्यात आलं आहे.

Live Updates
20:48 (IST) 12 Apr 2022

ज्या मुसलमानांना त्यांच्या प्रार्थना करायच्या आहेत त्या घरात करा. प्रत्येकानं आपला धर्म घरात ठेवावा, रस्त्यावर आणू नये. सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण समजू शकतो. पण ३६५ दिवस, २४ तास हे नाटक, लफडं महाराष्ट्रात चालणार नाही. एक गोष्ट सांगतो. आत्ता हनुमान चालीसा सांगितलीये. पण माझ्या भात्यातला पुढचा बाण अजून मी काढलेला नाही. तो काढायला मला लावू नका. माझी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की जिथे समाजाला त्रास होतोय, असा कोणताही धर्म असता कामा नयेत. आपल्याला तेढ, दंगली करायच्या नाहीत.

20:47 (IST) 12 Apr 2022

मला भोंग्यांचं राजकारण करायची गरज वाटत नाही. हा देश, महाराष्ट्र साफ झाला पाहिजे. इथले वयस्क, लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं यांना या भोंग्यांचा त्रास होता कामा नये. त्याच्यासाठी उद्या काही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या, तर माझ्यासकट आम्ही सगळे घेऊ. माझ्यावर शंभर-सव्वाशे आहेतच. अस्वलाच्या अंगावर अजून एक केस आला तरी काय फरक पडतो.

20:45 (IST) 12 Apr 2022

यांचं रोजचं चाललंय याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक. आम्ही सगळं विसरून गेलोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरू झालंय.

20:45 (IST) 12 Apr 2022

कसलं हिंदुत्व? जो फक्त दंग्यांमध्ये हिंदू होतो, तो हिंदू? महाराष्ट्रातल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या भामट्यांपासून दूर राहा. स्वत:च्या स्वार्थासाठी हे महाराष्ट्र खड्ड्यात घालतील. कुणाला कशाची चिंता नाही. ४-५ महिने झाले, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाहीये. मी पवारांकडे गेलो तेव्हा म्हणाले आपण यावर तोडगा काढू. अजून तोडगा निघत नाहीये. त्यांची दिवाळी खराब गेली सगळं खराब गेलंय. एकदा त्यांना काय ते निश्चित सांगा तरी.

20:43 (IST) 12 Apr 2022
शाळेतली, कॉलेजमधली मुलं एकमेकांकडे जातीच्या नजरेने बघायला लागली…

मराठेशाहीत अठरापगड जातीतले लोक शिवछत्रपतींनी जवळ आणले होते. त्यांच्याकडून, संतांकडून आम्ही घेतलेली शिकवण कुठे गेली? काय करतोय आपण? शाळेतली, कॉलेजमधली मुलं एकमेकांकडे जातीने बघायला लागलीयेत. महाराष्ट्राला कुणी हरवू शकलं नव्हतं. पण आता कोण हरवतंय? आमची जात? जातीतून बाहेर पडणार नसू, तर आपण मराठी कधी होणार? मराठी होणार नसू तर आपण हिंदू कधी होणार?

20:41 (IST) 12 Apr 2022

आता यांनी नवीन ओबीसी समाजाबद्दल काढलंय. ते कोर्टात गेल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या. मग पालिकांवर प्रशासक नेमले. म्हणजे राज्य सरकार आणि पालिका प्रशासन यांच्याचकडे… दोन्ही बाजूंनी खा.. काय हा महाराष्ट्र आपला?

20:40 (IST) 12 Apr 2022

महाराष्ट्रात जातीपातीचा चिखल होतोय. यांना यांचं जे राजकारण करायचं ते करू द्यात. पण बंधूभगिनींना माझी विनंती आहे की यातून बाहेर या. यातून आपल्या हाताला काहीही लागणार नाहीये. ही सगळी मंडळी फक्त तुमचा वापर करून घेतील. कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखालाखाचे मोर्चे निघाले. काय झालं त्याचं? यांंना निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला उचकवायचं होतं. त्यातून मतं पदरात पाडून घ्यायची होती.

20:39 (IST) 12 Apr 2022

बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. शरद पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत. पण याचं काय करायचं?

20:36 (IST) 12 Apr 2022

शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.

20:35 (IST) 12 Apr 2022
अफजलखान महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का? – राज ठाकरे

शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, मराठ्यांची माथी भडकवायची असतील… त्यांच्याच एका भाषणात अफजलखान इथे आला, तेव्हा महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता. तो हिंदू-मुस्लीम नव्हता म्हणे. मग तो आला कशासाठी होता? तो काय केसरी टूर्स, वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का?

20:33 (IST) 12 Apr 2022

मी शरद पवारांबद्दल बोललो, जातीपातीबाबत भूमिका मांडली, ते केवढं झोंबलं त्यांना.

20:31 (IST) 12 Apr 2022

सगळे गुढी पाडव्याच्या सभेनंतर एकदम चरफडले. एकच पालुपद लावलं की ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे 'लवंडे'… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं.

20:29 (IST) 12 Apr 2022

आझाद मैदानावर रझा अकादमीनं मोर्चा काढला, पोलीस भगिनींना मारलं, पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, पोलिसांना मारलं. कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. त्यानंतर तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर अरुप पटनायक आमच्या पोलिसांवरच डाफरत होते. हे पोलिसांना सांगत होते की त्यांना मारायचं नाही. तो मोर्चा आरूप पटनायक यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यासाठी. त्यानंतर आरूप पटनायक यांना पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आलं. तो मोर्चा आमचा होता.

20:27 (IST) 12 Apr 2022

शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. बरं शरद पवारांनी सांगावं की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी काँग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार ९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये. पाकिस्तानी कलाकारांना ढुंगणावर लाथ मारू हाकलण्याची भूमिका घेणारा पक्ष कोणता होता? पाकिस्तानी कलाकारांना घ्याल, तर याद राखा ही नोटीस सगळ्या निर्मात्यांना कुणाकडून गेली होती?

20:25 (IST) 12 Apr 2022

सलीम मामा शेख याच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक राहतात. पण सलीम निवडून येतो. याचं कारण हे मराठी मुसलमान. देशावर प्रेम करणारे, प्रामाणिक राहणारे मुसलमान. देशात धर्माचा अतिरेक करणारे जे लोक आहेत, त्यांच्यामुळे हे मुसलमान भरडले जात आहेत.

20:24 (IST) 12 Apr 2022

आता तुम्ही म्हणाल, वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार? मी कुठे म्हटलो होतो की अतिरेकी सापडणार नाहीत? या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय.

20:22 (IST) 12 Apr 2022
मुंब्र्यातून अटक अतिरेक्यांची यादी राज ठाकरेंनी वाचून दाखवली…

२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकाना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्ट २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक

20:21 (IST) 12 Apr 2022

यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला.

20:20 (IST) 12 Apr 2022

१८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी असेल, तर राज्याच्या गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे मतांसाठी होत नाही का? मग आम्ही हे उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे की देशात जिथे कुठे बांग सुरू असेल, तिथे हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. आम्हाला काय त्रास होतो, तो एकदा त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही.

20:18 (IST) 12 Apr 2022

३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाही. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. आज १२ तारीख आहे. १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही.

20:16 (IST) 12 Apr 2022

आज रमजान चालू आहे, आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो. नवरात्रौत्सव असतो. १० दिवसांत आपण समजू शकतो, तरीही तो लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, तो भाग वेगळा. सणवार असेल तर आपण समजू शकतो. पण ३६५ दिवस तुम्ही या लाऊडस्पीकरमधून गोष्टी ऐकवता, कशासाठी?

20:16 (IST) 12 Apr 2022
भोंगे हा धार्मिक नाही, सामाजिक विषय आहे – राज ठाकरे

वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना याचा त्रास होतो. एक तर सगळे बेसूर असतात. रस्त्यावर घाण झाली, फुटपाथवर घाण झाली तर ते आपण साफ करतो. मग कानांना त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला सांगतो, यातून मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी बंदी आहे, तिथे निमूटपणे ऐकता ना? माझ्या परिचयाचे मुस्लीम लोक येऊन सांगतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो इतर धर्मीयांना त्रास देतो?

20:13 (IST) 12 Apr 2022
अजानवर राज ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट

लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!

20:10 (IST) 12 Apr 2022
अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंचं लाव रे तो व्हिडीओ!

राज ठाकरेंनी आपल्याच विधानांचे २८ जुलै २०१८, एक ऑगस्ट २०१८, २३ जानेवारी २०२० असे तीन व्हिडीओ अजित पवारांसाठी वाजवले. यामध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत त्यांनी भूमिका मांडली होती.

20:09 (IST) 12 Apr 2022

आमचे लाडके अजित पवार का म्हणतायत बघा. त्यांचा आवडता शब्द आहे पठ्ठ्या. यांना काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का. याच्याआधी म्हणे झोपा काढत होतात का? अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय. तुमच्या माहितीसाठी फक्त ३ व्हिडीओ आणले आहेत. मी याआधीही बोललो होतो. पण त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही. त्यानंतर त्यांना कूSSS असा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही.

20:07 (IST) 12 Apr 2022

भुजबळ म्हणाले, मीही मोदी-भाजपाविरोधात बोलत होते. पण मला झालेला त्रास मी सहन केला. त्यासाठी मी माझा मार्ग बदलला नाही. भुजबळ साहेब, तुमचा सीए, आणि तुमच्यासोबतचा एक माणूस यांनी केलेल्या गैरव्यवहारांमुळे तुम्हाला आत जावं लागलं. मोदींवर टीका केली म्हणून नाही जावं लागलं. सत्ता आल्यावर पहिला शपथविधी यांचा होतो. सगळे म्हणतायत संपलेल्या पक्षावर काय बोलायचं, तरी बोलतायत.

20:05 (IST) 12 Apr 2022

जयंत पाटील म्हणतात, हा विझलेला पक्ष आहे. जंतराव, हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. माझ्या अक्षरावर थोडं इकडे-तिकडे झालेलं असेल तर सांभाळून घ्या. हे काय मला सांगतात. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कुणी हुंगून विचारत नाहीत. मला सांगतात यांचे आमदार कुठे गेले. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडून येणाऱ्या उमेदवारांची मोळी आहे. त्याची दोरी फक्त शरद पवार आहेत. ही माणसं दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेली, तरी निवडून येतील.

20:04 (IST) 12 Apr 2022

जंत पाटलांना काहीही सांगा, चकित चंदू. एकदा मी सांगितलं बेहरामपाड्यात जाऊन बघा. गंभीर परिस्थिती आहे. तर म्हणे खरं की काय, मला काही माहितीच नाही. सतत चेहऱ्यावर आश्चर्य असतं. संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार? आरे येऊन बघा, हा काय संपलेला पक्ष आहे का?

20:03 (IST) 12 Apr 2022

सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत.

20:03 (IST) 12 Apr 2022

ते दुसरे जंत पाटील म्हणतात, “हे कधी उत्तर प्रदेशात गेले होते ज्यांना आता उत्तर प्रदेशचं कौतुक वाटतं”… माझं भाषण नीट ऐका. मी म्हटलं होतं ज्या बातम्या येतायत, त्यानुसार उत्तर प्रदेशचा विकास झाला असेल, तर त्याचा मला आनंद आहे.

20:01 (IST) 12 Apr 2022

अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते. त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.

19:59 (IST) 12 Apr 2022

भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या. सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा करतोय. मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर बोलले असं म्हणे. आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय.

19:56 (IST) 12 Apr 2022

उद्या मला एखादी गोष्ट नाही पटली, तर परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिलेत, टीका करा असं नाही करणार. आता तुम्ही शेण खाल्लंय, आता तुमच्यावर टीका करणार.

19:55 (IST) 12 Apr 2022

आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, हा देश एक दिवस फुटेल. या काही गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहेत.

19:54 (IST) 12 Apr 2022

मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असं म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोललेत. मी एखादं स्वप्न एका पंतप्रधानाकडून पाहतो. ३० वर्षांनंतर एका व्यक्तीला पूर्ण बहुमत मिळाल्यावर ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्याबाबत मी एका भाषणातही बोललो होतो.

19:54 (IST) 12 Apr 2022

मी उघडपणे मोदींच्या भूमिकांविषयी बोललो. पण काश्मीरमधलं ३७० कलम त्यांनी रद्द केलं, तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्वीट माझं होतं.

19:53 (IST) 12 Apr 2022

मला तेव्हा मोदींच्या काही भूमिका नाही पटल्या. तेव्हा मी उघडपणे बोललो. आता हे म्हणतायत, मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला. मला नाही गरज ट्रॅक बदलायची. आयएलएफएस कंपनीची चौकशी होती, कोहिनूरची, त्यातून मी एका वर्षात बाहेर पडलो होतो. म्हणजे कुणी व्यवसायही करायचा नाही का? त्यासंदर्भात मला ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त ईडीची नोटीस येतेय अशी चाहूल लागली होती. त्यावरून केवढं नाटक केलं. आणि या हातांनी काही पापच केलं नाही, तर नोटीस राजकीय असो की कुणाचीही असो, मी त्याला भीक घालत नाही.

19:52 (IST) 12 Apr 2022
भाजपाची स्क्रिप्ट आली कुठून? – राज ठाकरे

गुढी पाडव्याच्या सभेला येताना अनेक पत्रकार स्वत:चा एक चित्रपट घेऊन आले होते. नरेंद्र मोदींवरही राज ठाकरे बोलतील. मी नाही बोललो. परत तशी वेळ आली तर बोलेन. इतरही विषय आहेत. तुमचेही वाभाडे मला काढायचे आहेत. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपा-शिवसेनेकडे बहुमत आल्यानंतरही तुम्ही मतदारांशी प्रतारणा केली. त्याआधी पाहाटेचा शपथविधी झाला. तो फिसकटला. मग यांचं सरकार बनलं. या दोन्ही गोष्टींवर मी बोलल्यावर भाजपाची स्क्रिप्ट कुठून आली? ते विसरले होते, मी फक्त आठवण करून दिली.

19:50 (IST) 12 Apr 2022

माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा लगान चित्रपट आला. त्यानंतर स्वदेस आला. मी तो पाहायला गेलो. मला त्याने बोलावलं होतं. मी तो चित्रपट पाहिल्यानंतर आशुतोषला म्हटलं अरे काय चित्रपट बनवला? असा काही चित्रपट असतो का? हे बोलून मी घरी आलो आणि विचार केला मी खरंच चित्रपट पाहिला का? की माझ्यामागे लगान चित्रपट होता? मी स्वदेस पाहायला गेलो, तेव्हा माझा एक चित्रपट डोक्यात घेऊन गेलो होतो. मी पुन्हा तो चित्रपट पाहिल्यानंतर आशुतोश गोवारीकरला म्हटलं मला माफ कर. मी तो चित्रपट व्यवस्थित पाहिला नव्हता – राज ठाकरे

19:47 (IST) 12 Apr 2022

त्या दिवशीची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांशी संबंधित पत्रकारांनी आपापला कंडू शमवून घेतला. मग वाट्टेल ते बोललं गेलं. भाजपाची स्क्रिप्ट होती वगैरे. महाराष्ट्रात अनेक गुणी पत्रकार या भामट्या पत्रकारांमुळे एकटे पडलेत.

19:46 (IST) 12 Apr 2022
…म्हणून सभा घेतली – राज ठाकरे

गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले, ते पाहिल्यावर मला वाटलं याचं उत्तर तर दिलं पाहिजे. पण मला पत्रकार परिषदेत याचं उत्तर द्यायचं नव्हतं. कारण मी जर पत्रकार परिषद घेतली असती तर या सगळ्या पक्षांना बांधील जे पत्रकार आहेत, तेही त्यात शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहून हे भलतीकडेच विषय भरकटवतात. – राज ठाकरे

19:44 (IST) 12 Apr 2022
पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं – राज ठाकरे

व्यासपीठावर येताना मला अग्निशम दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आगा लावणार नाहीये. आज दुपारी मी बसलो असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं किती वाजता निघणार आहात? म्हटलं का? तर म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही त्यांना ताब्यात वगैरे घेऊ. मी म्हटलं निघेन तेव्हा कळवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरंतर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते – राज ठाकरे

19:42 (IST) 12 Apr 2022
भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा टोला!

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो आणि मातांनो… माझा आज भाषण करताना कदाचित टेबलफॅन होणार आहे – राज ठाकरे

19:37 (IST) 12 Apr 2022
राज ठाकरे ठाण्यात सभेच्या ठिकाणी पोहोचले, थोड्याच वेळात तोफ धडाडणार!

राज ठाकरे ठाण्यात सभेच्या ठिकाणी पोहोचले, थोड्याच वेळात तोफ धडाडणार!

19:36 (IST) 12 Apr 2022
शरद पवार हे तर बिन चिपळ्यांचे नारद – प्रकाश महाजन

संजय राऊतांच्या दोन-चार फायली भाजपावाल्यांनी काढल्या नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन सगळा गोंधळ घातला. – प्रकाश महाजन

19:16 (IST) 12 Apr 2022
माझी जात न बघता राज ठाकरेंनी पद दिलं – सलीम शेख

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती, तेव्हा राज ठाकरेंनी माझी जात न बघता मला तिथे सभागृह नेता केलं. राज ठाकरे त्यावरही थांबले नाहीत. नाशिक महानगर पालिकेची स्थायी समितीचं सभापती देखील मला केलं. गटनेता केलं. ते कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते, यापुढेही राहणार नाही. – सलीम शेख

18:51 (IST) 12 Apr 2022
राज ठाकरेंच्या सभेमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी!

राज ठाकरे यांच्या सभेमुळे कोर्टनाका, जांभळीनाका आणि तलावपाली परिसरात वाहतूक कोंडी…

18:49 (IST) 12 Apr 2022

गेल्या ४-५ दिवसांत राज्यातल्या प्रत्येक पक्षानं मला ऑफर दिली. जर राज ठाकरेंना एकहाती सत्ता दिली, तर आपल्या लोकांना अमेरिकेतून ऑफर येतील – वसंत मोरे

18:48 (IST) 12 Apr 2022

मला चंद्रकांत पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल. मी त्यांना म्हणालो, १५ वर्ष भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होत आहोत – वसंत मोरे

Web Title: Raj thackeray mns uttar sabha thane reply sharad pawar uddhav bjp b team pmw

ताज्या बातम्या