Raj Thackeray Uttar Sabha Thane मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये केलेल्या चौफेर फटकेबाजीवरून आता राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ठाण्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांना उघड आव्हान दिलं आहे.

“हनुमान चालीसा लागलीच पाहिजे”

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवर राज ठाकरेंनी बोलताना १८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. “१८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे या मुद्द्यावर. तर मग राज्याच्या गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे मतांसाठी होत नाही का? मग आम्ही हे उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे की देशात जिथे कुठे बांग सुरू असेल, तिथे हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. आम्हाला काय त्रास होतो, तो एकदा त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“काय पण चेहरा आहे? नागानं फणा…”

दरम्यान, या मुद्द्यावरून बोलताना राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांची नक्कल करत त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोले लगावले. “यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. म्हणे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला”, अशा प्रकारे एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंनी टीका केली.

“शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने…”, राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा!

मुंब्र्यातून अटक दहशतवाद्यांची दिली यादी

यावेळी राज ठाकरेंनी मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादीच सादर केली. “२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकाना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्ट २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक”, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

Raj Thackeray Uttar Sabha : “कसलं हिंदुत्व? जो फक्त दंग्यांमध्ये हिंदू होतो तो…”, ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंची चौफेर टोलेबाजी!

“आता म्हणाल, वस्तरा कुठे सापडला?”

दरम्यान, यावरूनही राज ठाकरेंनी आव्हाडांवर निशाणा साधला. “आता तुम्ही म्हणाल, ‘वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार? मी कुठे म्हटलो होतो की दहशतवादी सापडणार नाहीत?’ या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय”, असं राज ठाकरे म्हणाले.