Raj Thackeray On Ajit Pawar plane crash FIR Controversy : अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झालं. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेऊन अनेक सवाल उपस्थित केले. तसेच मुंबई आणि बारामतीमधील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली.
या पार्श्वभूमीवर आज रोहित पवारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भातील सर्व माहिती राज ठाकरे यांना सांगत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘अजित पवारांच्या अपघात प्रकरणात काही काळंबेरं आहे का? असा संशय निर्माण होतोय. कारण सरकार एफआयआर का दाखल करून घेत देत नाहीये? एफआयआरला सरकार का घाबरतंय?’, असे सवाल राज ठाकरे यांनी विचारले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
“रोहित पवारांनी मला भेटून सर्व टेक्निकल गोष्टी सांगितल्या. मला त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली ती त्यांनी तीन ठिकाणी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तिन्ही ठिकाणी एफआयआर दाखल करून घेतले गेले नाही. संबंधित पोलीस ठाण्याला सांगितलं गेलं की एफआयआर दाखल करून घ्यायचे नाही. त्यामुळे मला इथे जास्त संशयाची सुई वाटते. राज्य सरकार एफआयआर दाखल करून का घेऊ देत नाही? हा प्रश्न आहे. जेव्हा रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा तेथील अधिकारी त्यांचा एफआयआर लिहून घेत होते. मात्र, तेवढ्यात डीसीपी आले आणि त्यांनी सांगितलं की एफआयआर दाखल करून घ्यायचा नाही. हे काय आहे?”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“अजित पवार यांचा निव्वळ अपघात असेल. पण समजा त्यांच्या घरच्यांना जर काही संशय असेल तर आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्यवस्थित व्हावी असं वाटत असेल तर मग एफआयआर दाखल करून घेण्यास सरकार अडथळे का आणतंय? सुनेत्रा पवार तिकडे उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत, त्यांनी देखील या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. मात्र, सरकारकडून एफआयआर दाखल करून न घेण्यासाठी का दबाव येतोय? मला याचं राजकारण माहिती नाही. राज्यात सांगितलं गेलं की कोणीही एफआयआर दाखल करू शकतो. पण एफआयआर नोंदवायला गेलेल्या व्यक्तीला तुम्ही अडथळे आणत असाल तर यामध्ये काही काळंबेरं आहे का? असा संशय निर्माण होतोय”, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
‘एफआयआर नोंदवून का घेतला जात नाही’
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकार संशय निर्माण करत आहे. जर एफआयआर नोंदवायचा असेल आणि योग्य चौकशी व्हावी असं वाटत असेल तर त्यात गौर काय? त्यामुळे सरकारने या गोष्टींची उत्तरे दिली पाहिजेत. तसेच त्या ब्लॅक बॉक्सच देखील अद्याप काही कळालेलं नाही. सरकार अशा प्रकारे संशयाची भूते नाचवत आहे. यामध्ये काय राजकारण आहे मला माहित नाही. पण माझा फक्त एकच प्रश्न आहे की एफआयआर नोंदवून का घेतला जात नाही आणि तो एफआयआर नोंदवला जाऊ नये यासाठी सरकार का प्रयत्न करत आहे? याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

