Raj Thackeray on Badlapur School Case : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

“बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे”, असं राज ठाकरे म्हणाले. “मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या”, असंही राज ठाकरे म्हणाले.

बदलापुरात रास्ता रोको, रेल रोको पुकारला

बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनावर टिकीची झोड उठवली जात असतानाच सोमवारी शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबीत करण्यात आले. मंगळवारी पालक आणि सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी पालक आणि बदलापुरकर शाळेच्या बाहेर जमू लागले होते. सकाळी आठ वाजेपर्यंत हजारो नागरिक शाळेच्या बाहेरील रस्त्यावर जमले होते.

हेही वाचा >> बदलापूर-कर्जत रेल्वे वाहतूक ठप्पच, सहा तासानंतरही ठिय्या आंदोलन कायम

घटनेचे गांभीर्य न ओळखता दुर्लक्ष करणारे पोलिस, शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध आंदोलक घोषणा देत होते. आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला. विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जुनी इमारत ते थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत आंदोलक पसरले होते. पोलीस प्रशासन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दहा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते

मुख्यमंत्री शिंदेंनीही दिली प्रतिक्रिया

या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली असून याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिले आहे. पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश मी दिले आहेत. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.