Raj Thackeray and Uddhav Thackeray Victory Rally: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधूं अनेक वर्षांनंतर एका व्यासपीठावर येत असल्यामुळे या मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा इशारा दिला आहे. ‘तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चांनीच माघार घ्यावी लागली. मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“खरं तर आजच्या मेळाव्यालाही कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही. खरं तर हा प्रश्नच अनाठायी होता. मात्र, हिंदी सक्तीचा विषय कोठून आला? ते मला कळलं नाही. हिंदी सक्ती ही कोणासाठी? लहान मुलांसांठी हिंदी सक्ती का? कोणाला विचारायचं नाही, काही नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, फक्त आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, मग आम्ही लादणार, तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे” , असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.
बाळासाहे ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले-राज ठाकरे
माननीय बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, इंग्रजी वर्तमान पत्रात व्यंगचित्र काढत होते. पण मराठीच्या अभिमानाबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. असं राज ठाकरेंनी म्हटलं, तसंच यांचं पुढचं राजकारण तुम्हाला जातीपातींमध्ये लढवण्याचं असेल तेव्हा सावध राहा असंही राज ठाकरे म्हणाले. आज मराठी म्हणून एकत्र आला आहात. महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र आला आहे. यांचं पुढचं राजकारण हे जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. मराठी म्हणून तुम्हाला हे एकत्र येऊ देणार नाहीत. जातीपातींमध्ये विभागायला सुरुवात करतील, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘…तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे’
“मीरा रोडला व्यापाऱ्याच्या कानफटीत मारली, त्याच्या काय कपाळावर लिहिलं होतं का तो गुजराती माणूस आहे? बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. अजून तर आम्ही काहीच केलेलं नाही”, असंही राज ठाकरेंनी म्हटलं. “मराठी भाषा आली पाहिजे, विनाकारण मारामारी करायची गरज नाही. पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. चूक समोरच्यांची असली पाहिजे. शिवाय अशा गोष्टी कराल तेव्हा व्हिडीओ काढू नका. उठसूट कुणाला उगाच मारु नका. अनेक गुजराती लोक आहेत, माझे मित्र आहेत खूप चांगले आहेत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.