scorecardresearch

Premium

“आनंद, उत्साहाची किंमत मोजतोय, आपलं कुठेतरी…”, सणांमधील डीजेच्या आवाजावरून राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त

“आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा अन्…”, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं.

raj thackeray
राज ठाकरे यांनी डीजे आणि डॉल्बीवर मत व्यक्त केली आहे. ( संग्रहित छायाचित्र )

महाराष्ट्रात गणोशोत्सव उत्साहात पार पडला. पण, कुठेतरी डीजे बंद करण्यास सांगितल्यानं मारहाण अथवा आवाजामुळं मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी गोष्ट नक्कीच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर राज ठाकरे म्हणाले, “सस्नेह जय महाराष्ट्र… महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा ह्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.”

supriya sule denies contact of praful patel with sharad pawar
शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
pankaja munde raj thackeray
“सोसायटीचं नाव सांगा, त्यांना धडा शिकवू”, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर मनसे नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया
rahul narwekar asim sarode
“अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले…
Chandrasekhar Bawankule apologized to Ajit Pawar
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?

“धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही”

“मी आज ज्यावर बोलतोय त्याची पार्श्वभूमी नुकताच पार पडलेला महाराष्ट्रातील महाउत्सव आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप हे आहे. गणपती असो, दहीहंडी असो की नवरात्रोत्सव असो, रामजन्माचा उत्सव असो की इतर हिंदू देवतांचे उत्सव असोत, ते ह्या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत. आणि त्यावर सरकारांनी जरी निर्बंध आणले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळेस सरकारशी संघर्ष केला आहे आणि ह्यापुढे पण गरज पडली तर करत राहू. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे, त्यांचा मुखभंग पण आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा : राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र चर्चेत, खास संदेश देत म्हणाले “आम्ही जातीय विद्वेषात…”

“मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात, मात्र…”

“पण, ह्या उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी ह्यांच्या आवाजाच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. ह्यात मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात. मात्र, पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४, २४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल, तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

“शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही, पण…”

“त्यातच एक बातमी आली की, एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं, म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण, कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “…तर गालावर वळ उठतील हे नक्की”, राज ठाकरेंनी ‘त्या’ प्रकारावरून दिली तंबी; म्हणाले, “मराठी आहे म्हणून…!”

“सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार”

“उत्सव आणि आनंद साजरा व्हायलाच पाहिजे. पण, माफक प्रमाणात पारंपरिक ढोलताशा पथकं, लेझीम अशा पद्धतीने मिरवणूक जर आपण काढली तर त्याचं पावित्र्य टिकेल, आनंद द्विगुणित होईल आणि हे बघायला जगभरातून लोकं येतील. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. मात्र, एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“…तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असेल”

“शहरातील होर्डिंग्स ह्याने शहर विद्रुप होतात, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि मी ह्या आधी म्हणलं तसं होर्डिंग संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. त्याच धर्तीवर, ह्या उत्सवातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दूर करायला संपूर्ण राजकीय व्यवस्था तयार असेल, तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असेल. हिंदू सणांसाठी आम्हीच संघर्ष करतो आणि ते साजरे करताना जर काही चुकीचं आढळलं, तर आम्ही पुढाकार घेऊ हा माझा शब्द आहे. आता विचार सगळ्या राजकीय पक्षांनी आणि अर्थातच समाजाचं नेतृत्व किंवा प्रबोधन करण्याची क्षमता असणाऱ्यांनी करायचा आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray on dj and dolby in hindu ganeshotsav dahi handi ram janmashtami navratra ssa

First published on: 01-10-2023 at 16:50 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×