Raj Thackeray On KDMC Politics : राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना (शिंदे) भाजपाला बाजूना ठेवून स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत घडलेल्या घडामोडींची राज्यात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात बोलताना कल्याण-डोंबिवलीबाबत सूचक भाष्य केलं आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या आणि बदलत्या राजकीय परिस्थितीवर परखड मत व्यक्त करत कल्याण-डोंबिवलीचा उल्लेख करत आजचं राजकारण पाहून शिसारी येते आणि आपण व्यथित होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“आज अनेक ठिकाणी, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये किंवा कल्याण -डोंबिवली असेल किंवा इतर ठिकाणी. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी माझं बोलणं झालं. शिसारी आली शिसारी. ज्याला आपण व्यथित होतो म्हणतो ना? काय सुरू आहे आणि कुठे नेतोय आपण हे सगळं?”, असं सूचक भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

‘आज बाळासाहेब नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट नाही’, राज ठाकरे असं का म्हणाले?

“आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते, बाळासाहेब नाहीत ते बरंच आहे”, असे उद्विग्न विधान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना केले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आजची परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यथित झाला असता. त्या माणसाला काय त्रास झाला असता. पूर्वी चावडीवर उभे राहून माणसांचे लिलाव चालायचे, आज त्याप्रमाणे महाराष्ट्रात लिलाव सुरू आहेत. आज सर्व जिल्ह्यात हेच सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर माझे बोलणे झाले. सध्याचे चित्र पाहून शिसारी आली. आज हे चित्र पाहायला माननीय बाळासाहेब नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट नाही.”

“बाळासाहेब ठाकरे हे पाहूच शकले नसते. त्यांनी शून्यातून गोष्टी उभ्या केल्या होत्या. बाहेरच्या पक्षात बघा. अनेक लोक असे दिसतील, ज्यांना बाळासाहेबांनीच उभे केले होते. मी ज्यावेळी बाहेर पडलो, ते माझ्यासाठी गोष्टी वेगळ्या होत्या. माझ्याबाबतीत पक्ष नाही तर घर सोडण्याचा विषय होता. पण त्यालाही २० वर्षांचा काळ लोटला आहे. अनेक गोष्टी मला उमजल्या, उद्धव ठाकरेंनाही अनेक गोष्टी उमजल्या असतील. ते आता सोडून द्या”, असे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या घटनेवर रोखठोक भाष्य केले.

“माझ्या डॉक्टरांनीही पक्ष बदलला की काय?”, राज ठाकरेंनी किस्सा सांगताच एकच हशा

“महापालिका निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे अजारी पडले होते. त्यांना सर्दी, खोकला वैगेरे झालं होतं, त्यानंतर आता मला सर्दी, खोकला, ताप वैगेरे झालं आहे आणि अद्यापही सुरूच आहे. मी काल यांना म्हटलं की मला जास्त बोलता येणार नाही. कारण सर्दीमुळे शब्दांवरील अनुस्वार गेले आहेत. माझे फॅमिली डॉक्टर आहेत, यादव म्हणून. मराठी यादव. मी त्यांच्याकडून औषधे घेतले आणि उद्धव ठाकरे यांना दिले तर ते दोन दिवसांत बरे झाले. पण मी त्याच डॉक्टरांकडून औषधे घेत आहे, आज सहा दिवस झाले. पण तरी मला बरं वाटत नाही. त्यामुळे परवा मी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि म्हटलं की माझ्या डॉक्टरांनी देखील पक्ष बदलला की काय?”, असं राज ठाकरे यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.