Raj Thackeray Mumbai Goa Highway Delay statement : गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडल दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी सर्वच राजकीय नेत्यांवर टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे हा महामार्ग रखडला असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसंच, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह स्थानिक राजकीय नेते सुनील तटकरे यांचाही उल्लेख केला.
राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्ग रखडला
“राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग होत नाहीय. मी मागे याबाबत नितीन गडकरींनाही फोन केला होता. ते म्हणाले होते की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले आहेत. नितीन गडकरी हे रस्ते विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत. ते कोकणातील कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं बोलत असतील तर ते कोणाला कंटाळून निघून गेले?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “आतापर्यंतची पद्धत अशी आहे की तुम्हाला रस्ता बांधायचा असेल तर जमिनीचं संपादन सरकारने करून द्यायचं असतं. हे सगळे रस्ते करत असताना हाच प्रोब्लेम झाला. सरकारने जमिन संपादित करून दिली नाही. कंत्राटं दिली, टक्केवारी दिली. रस्ता तिथेच आहे. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. मी आता नवीन बांधलेल्या रस्त्यावरून आलो, काय अवस्था आहे या रस्त्याची? नवीन बनवलेल्या रस्त्याची ही अवस्था असेल तर बायपासची गरज काय?”
माजी जमीनमालकांसमोर तिसरी मुंबई उभी राहणार
“विकास करताना टक्केवारीचाच विचार केला जात आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील हाच व्यवहार सुरू आहे. आता सध्या तिसऱ्या मुंबईचं सुरू आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल संस्था, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असणार आहेत. पण हे महाराष्ट्रातील मुलांनाही माहिती नाही. इथले स्थानिक माजी जमीन मालक म्हणूनच इथे राहणार त्याच्या समोर ही तिसरी मुंबई तयार होणार. या तिसऱ्या मुंबईबाबत पेण, पनवेल, रायगडच्या मुलांना आपण तयार करतोय का? शहरं उभी करायची, रस्त्यांची वाट लावायची आणि जमिनी विकण्याचा धंदा सुरू आहे. विकासाला विरोध करायचा नाही, पण कोकणातील विकास पाहिला तर असा विकास नको असं वाटतं”, असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.
“महाराष्ट्रातील पोरांची प्रगती होत नसेल तर चाटायची आहे का ही जमीन आहे? विकास कुठे होणार आहे हे आमदारांना माहितेय. मग ते तिथे जमिनी विकत घेणार. मग सरकार अदानी वगैरेंना या जमिनी विकणार. हे राजकारण्यांना माहितेय. स्थानिकांना हे समजणं गरजेचं आहे. सगळीकडे तटकरे आणि त्यांची मुलगी, ठाकूर आणि त्यांचा मुलगा, हेच सुरू आहे. आमच्या लोकांना समजत नाहीय”, असं म्हणत राज ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांवर आगपाखड केली.
