Raj Thackeray on Narendra modi GDP Statement : देशाचा जीडीपी दर ७.८ पर्यंत पोहोचल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन करून भारतीयांना काही महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. देशाची आर्थिक वृद्धी होण्याकरता परदेशी जाऊ नका, सोनं खरेदी करू नका, अशी सूचना पंतप्रधाननरेंद्र मोदींनी दिल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. ते ठाण्यातील आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
विदेशातून मोदींनी सांगितलं विदेशात जाऊ नका
“काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी किर्गिस्तानला गेले होते. तिथून त्यांनी परत एकदा भारतीयांना सांगितलं कोणी विदेशात जाऊ नका. मला ही गोष्टच फार आवडली. विदेशातून भारतीयांना सांगायचं की विदेशात जाऊ नका”, राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
“भारताचा विकास दर ७.८ टक्के झाला आहे, जो अमेरिका आणि चीनपेक्षाही जास्त असल्याचा दावा केला जातय. असं असतानाच नरेंद्र मोदी सांगत आहेत की परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका. जीडीपी वाढलेला असताना परदेशी का जायचं नाही? सोनं खरेदी का करायची नाही?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. “घरात चणचण असते, काटकसर तेव्हाच सुरू होते. संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ढासाळलेली आहे. आर्थिकदृष्ट्या पुढे अनेक गोष्टी होतील. नीटसाठी जेन-झी रस्त्यावर उतरले होते, उद्या अख्खा देश रस्त्यावर येईल”, असंही राज ठाकरे म्हणाले.
“आपण चाललोय कुठे आणि करतोय काय? जातीच्या वादात, धर्माच्या वादात तुम्हाला गुंतवून ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्ही त्यांत गुंतून राहिलात की बाकीचे प्रश्न विचारायला मोकळे नसता. देशात सर्वाधिक बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. पण आमच्यापर्यंत कोणी पोहोचायचा प्रयत्न करत नाहीत. सर्व गोष्टी बंद करायच्या. त्याला सोशल मिडिया हे उत्तर आलंय. जे आता यांना भारी पडलंय”, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागली.
५०३ परदेशी कंपन्यांचं कामकाज बंद
“आर्थिक वर्ष २०२१ ते २०२६ या काळात ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातील कामकाज बंद केलेलं आहे. या ५०३ कंपन्यांनी कामकाज बंद केलंय, याचा अर्थ नोकर्या किती गेल्यात याचा अंदाज बांधा. हा डेटा कोणाचा आहे, हा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा आहे. हा व्हॉट्सअॅपवर आलेला डेटा नाहीय”, असं राज ठाकरे म्हणाले.
