Raj Thackeray Padwa Melava MNS 19 March Coincidence : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज २० वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. किल्ले रायगडावरूनच आज मनसेच्या सदस्य नोंदणीलाही सुरुवात झाली. दरम्यान, दरवर्षी वर्धापन दिन एखाद्या सभागृहात साजरा केला जातो. मात्र, यंदा किल्ले रायगडावर हा सोहळा झाला. यामागचं कारणही आज राज ठाकरे यांनी सांगितलं.

पाडवा मेळाव्याला बोलणार

राज ठाकेर किल्ले रायगडावरून म्हणाले, “दरवर्षी आपण एखाद्या हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा करतो. तिथे तुम्ही येता. पण यावर्षी मी ठरवलं की ९ तारखेला वर्धापन दिन, १९ तारखेला गुढी पाडवा मेळावा. जे काय बोलायचं ते १९ तारखेलाच बोलून टाकू. म्हणून मग आम्ही ठरवलं की ९ तारखेला सदस्य नोंदणी करावी. “

वर्दळीच्या ठिकाणी सदस्य नोंदणीकरता स्टॉल्स लागले पाहिजेत

“महाराष्ट्रातील सैनिकांना आवाहन आहे की वर्दळीच्या जागेवर पक्षांना सक्रिय सदस्य नोंदणी घ्यायची आहे. ज्या वर्दळीच्या जागा, शाळा, कॉलेज, मंदिरे, मार्केट येथे मनसेचे सदस्य नोंदणीचे स्टॉल्स लागले पाहिजेत. अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले. आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावर नोंदणीची सुरुवात करत आहोत, असंही ते म्हणाले.

२० वर्षांनंतर योगायोग

“काय योगायोग आहे पाहा. पहिली सभा २० वर्षांपूर्वी १९ मार्चला झाली होती. आज २० वर्षांनी गुढीपाडव्याच्या सभेला १९ मार्च हीच तारीख आली. त्यामुळे जल्लोषात, उत्साहात शिवतीर्थावर यावं”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंची १९ तारखेची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२० वर्षांपूर्वी काय भाषण केलं होतं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्च २००६ साली शिवाजी पार्क मैदानात पहिल्यांदा भाषण केलं होतं. मनसेच्या निर्मितीनंतरचं हे पहिलं भाषण होतं. तेव्हा ते म्हणाले होते, “मी लहान असल्यापासून बाळासाहेबांबरोबर येथे येत आहे. प्रत्येक सभांना बसलो. पण भविष्यात मी कधी स्वतःचा राजकीय पक्ष काढेन आणि शिवतीर्थावर माझ्यावर भाषणाची वेळ येईल, याचा विचारच केला नव्हता. ही वेळ का आली, कशामुळे आली हे सर्वांनाच माहितेय. १९६६ साली माझ्या काकांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना याच शिवतीर्थावर केली, तेव्हा माझे आजोबाही येथे हजर होते. फरक कसा पडला तो फक्त बघा. त्यावेळी माझे आजोबा म्हणाले की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आज मी येथे उभा असताना माझ्या मागे बोलायला कोणी नाहीय, पण मी स्वतःच सांगतोय की मी स्वतःला या महाराष्ट्राला अर्पण करत आहे.”