“महाराजांचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला”; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने राज ठाकरे भावूक

माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, पण मला पितृतुल्यही होते, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना समाजातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला, अशा शब्दांत राज यांनी पुरंदरे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, “बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातली आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहिलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, पण मला पितृतुल्यही होते”.

राज ठाकरे पुढे म्हणतात, “बाबासाहेब मला नेहमी सांगत, “महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला आहे, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा गेलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे ती म्हणजे महाराज जिथे गेले आहेत तिथे जायची”. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण, सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली”.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी राज ठाकरे यांचे घनिष्ट संबंध होते. राज ठाकरे बऱ्याचदा बाबासाहेबांची भेट घेत असत. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमातही राज ठाकरे उपस्थित होते. आज त्यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात पर्वती इथल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तर त्यांच्या अंत्यसंस्कारांच्यावेळीही राज ठाकरे हजर होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj thackeray pays tribute to babasaheb purandare death vsk

ताज्या बातम्या