Raj Thackeray: आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावरुनही शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी एक खास पोस्ट केली आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
आज महात्मा गांधींची जयंती. ‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’, असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला ‘मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर….’ याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची.
हे पण वाचा- राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
महात्मा गांधींनी जो विचार रुजवला तो…
या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट ‘गांधी’ हा राज ठाकरेंचा आवडता सिनेमा आहे. बायोपिक असावा तर असा हे उदाहरण राज ठाकरेंनी अनेक मुलाखतींमधून दिलं आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीतही त्यांनी हा उल्लेख केला होता. महात्मा गांधी यांच्यावर आधारित चित्रपटाचं आकर्षण त्यांना आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या निमित्ताने राज ठाकरेंनी जी पोस्ट केली आहे त्या पोस्टची चांगलीच चर्चा होते आहे. महाराष्ट्रातले वाचाळवीर हा त्यांचा उल्लेख लक्षात घेण्यासारखा आहे यात काही शंकाच नाही.