पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचं मंगळवारी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय.पाटील यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूरमधील अंबप गावात झाला होता. कोल्हापूरच्या मातीतले रांगडे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. याच डी.वाय. पाटील यांच्याविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट लिहिली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं. शिक्षणक्षेत्रात संस्थाउभारणीचं मोठं काम करणाऱ्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. डी. वाय. पाटील ज्या काळात राजकारण आणि समाजकारणात आले, तो काळ वेगळा होता. तो केवळ सत्तेचा नव्हता, तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं वेगाने विस्तारत होतं आणि त्यातून राज्यातील मोठ्या भागात आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती.
डी.वाय. पाटील यांचं कार्य मोठं होतं-राज ठाकरे
मात्र त्याच काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संस्था, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांतील अनेक नामांकित महाविद्यालयांचा इतिहास ब्रिटिशकालापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा भक्कम पाया घातला; पण इतक्या विशाल देशात व्यावसायिक शिक्षणाची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. ती गरज केवळ सरकारच्या बळावर पूर्ण होणं शक्य नव्हतं आणि त्याही पेक्षा शिक्षणावरचा सरकारचा खर्च हा प्रत्येक दशकांत कमीच होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाचं खासगीकरण हे अपरिहार्य होतं. अशा वेळी डी. वाय. पाटील यांनी शिक्षणातील संस्थात्मक उभारणीचं मोठं काम हाती घेतलं. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत उपलब्ध व्हायला हवं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण वास्तव हे आहे की भारतात शिक्षणावरील सार्वजनिक खर्च दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. अशा परिस्थितीत खासगी क्षेत्राने शिक्षणात पुढाकार घेऊन संस्था उभारण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या नेत्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेल्या संस्थांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं.
लाखो विद्यार्थी घडवण्याचं काम डी. वाय. पाटील यांनी केलं-राज ठाकरे
गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले. हे योगदान मोठं आहे.एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाहीत; त्याभोवती वसतिगृहं, रुग्णालयं, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचं संपूर्ण अर्थकारण उभं राहतं. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, हे जुन्या पिढीतील अनेक नेत्यांच्या मनात पक्कं रुजलेलं होतं. शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम—दोन्हीकडे त्यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्टपणे दिसून येते. राजकारणातून संस्था उभारून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते. डॉ. डी. वाय. पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे
अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु रजनीश कामत यांनीही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. जे कराल तेमनापासून करा. जिथे जाल तिथेसर्वोच्च बना,’ असा संदेश पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील नेहमी देत असतं.डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु रजनीश कामत यांनी दिली आहे.
