MNS Raj Thackeray Press Conference : महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नवीन शिक्षण धोरणात हा निर्णय घेतला आहे. मी यासंदर्भात दोन पत्रं महाराष्ट्र सरकारला पाठवली होती. असं म्हणत राज ठाकरेंनी ती पत्रंही वाचून दाखवली. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा देणार असाल तर संघर्ष अटळ आहे असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं होतं.

माझं पत्र आता शाळांना जाणार आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला हा निर्णय मागे घेऊ असं सांगितलं होतं. आज मी तिसरं पत्र लिहिलं आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार मध्ये तिसरी भाषा कुठली शिकवणार आहेत? राज्य सरकारने धोरण ठरवायचं आहे असं केंद्राने म्हटलं आहे मग हिंदीची सक्ती का केली जाते आहे? गुजरातची एक वेबसाईट आहे त्यावर त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की गुजराती, गणित आणि इंग्रजी असे तीन विषय पहिलीपासून ठेवले आहेत. मग महाराष्ट्रात सक्ती का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा प्रय़त्न चालला आहे-राज ठाकरे

हिंदी भाषा का लादण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. मुळात सरकारकडून हे सगळं लादलं का जातं आहे? हा माझा प्रश्न आहे. माझी पत्रकार परिषद महाराष्ट्रासाठी, पालकांसाठी, मुलांसाठी, शिक्षकांसाठी, शाळांसाठी आहे. महाराष्ट्राच्या शाळांना हे मान्य आहे का? सरकारला हे कोणतं धोरण आहे ते मला समजलेलं नाही. भाषावर प्रांतरचना झाली आहे तर मग हे भाषा लादण्याचं कारण काय? पत्रकार म्हणून तुम्ही, साहित्यिकांनी, लेखकांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारला गेला पाहिजे. हा विषय आज लादला गेला तर नजिकच्या काळात मराठीचं अस्तित्व हे संपवून टाकतील. जेवढा या हिंदी सक्तीला विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. शाळा हिंदी भाषा कशी शिकवतात तेच आम्ही बघू. महाराष्ट्र सरकारला हे आव्हान वाटत असेल तर आव्हान असंही राज ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमध्ये सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?

केंद्रात अमित शाह आणि नरेंद्र मोदी बसलेले असताना जर गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती का? सहावीपासून हिंदीचा पर्याय आहे मग तो पहिलीपासून का आणला जातो आहे? आयएस अधिकाऱ्यांना हिंदी बोलणं सोपं जावं यासाठीची धोरणं आहेत का? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर त्यांनी याबाबत विचार करायला पाहिजे. कोणत्या शाळा हिंदी शिकवत आहेत ते मला बघायचंच आहे. केंद्राचं शैक्षणिक धोरण आणि त्याबाबतचा जो दाखला मुख्यमंत्री देत आहेत ते खोटं बोलत आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला. तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही ती भाषा शिकाल. भाषा लादायची याला काय अर्थ आहे? मध्य प्रदेशात, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशात तिसरी भाषा काय मराठी शिकवणार आहात का? हिंदीची सक्ती गुजरातमध्येही नाही. मग महाराष्ट्रातच का हे केलं जातं आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मराठी आहात म्हणजे कोण तर मराठी बोलणारे तुमचं अस्तित्व मिटवायला हे निघाले आहेत. कुठलंही राजकारण न आणता याचा विचार आपण केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी येणार एकदा ते घुसलं की मग नंतर बाहेर नाही काढता येणार नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.