मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा, त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये आता राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

बृजभूषण यांच्यावर तोफ धडाडणार?

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा अनेकदा अपमान केला असून जोपर्यंत ते उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाय देखील ठेऊ देणार नाही, असा पवित्रा बृजभूषण सिंह यांनी घेतला आहे. अशा उघड आव्हानानंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज ठाकरे कधीही अयोध्येत गेले, तरी त्यांचं स्वागतच होईल, अशी भूमिका मांडली. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच राज ठाकरेंनी दौरा स्थगित करत त्यावर आजच्या सभेत सविस्तर बोलण्याचं जाहीर केलं.

अकबरुद्दीन ओवेसींचा समाचार घेणार?

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरून बरीच टीका झाली. या दौऱ्यात ओवेसी यांनी राज ठाकरेंवर देखील खालच्या स्तरावर टीका केली होती. त्यांचा देखील राज ठाकरे आजच्या सभेत समाचार घेण्याची शक्यता आहे.

संजय राऊत निशाण्यावर?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत राज ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि अयोध्या दौऱ्यावरून सातत्याने टीका करत आहेत. एका रात्रीत हिदुत्ववादी झाले आणि अयोध्येला निघाले असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. तसेच, अयोध्या दौऱ्यात काही मदत लागल्याचं त्यांनी सांगितलं असतं, तर आम्ही मदत केली असती, असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावला आहे.

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील राज ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याचं बोललं जात आहे. शिवाय, स्थगित केलेला अयोध्या दौरा नेमका कधी करणार? यासंदर्भात देखील राज ठाकरे आज घोषणा करण्याची शक्यता आहे.