ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीसाठी भाजपाला मदत केली आणि त्यांच्यामुळेच भाजपाला निवडणुका जिंकता आल्या असा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे. मतचोरीमुळे देशभरात वातावरण तापलं आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या आक्रमक भाषणाला सुरूवात केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढला आहे. मतचोरीच्या विरोधात आपण बोललंच पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी २०१७ ते २०१८ पासून मी सांगत होतो, की मतचोरी होते आहे. सोनिया गांधी असोत, ममता बॅनर्जी असोत मी सगळ्यांची भेट घेतली होती. निवडणुकांवर बहिष्कार टाका, कारण तोपर्यंत पारदर्शक कारभार होणार नाही. अशा पद्धतीने मतं कमी होऊ शकत नाहीत आणि मतं अशी वाढू शकत नाहीत. मी हा दावा केला होता की मतचोरी होते आहे असं राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे. मी जे तेव्हा म्हणत होतो ते आत्ता सगळ्यांना म्हणत होतो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला मिळालं. महाराष्ट्रात काय सन्नाटा, जल्लोष नाही. असा कुठला विजय असतो? जिथे विजय मिळाल्यानंतर लोकांमध्ये उत्साह किंवा जल्लोष नसतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक पार पडली होती. त्यात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असा कुठला व्हायग्रा आहे की दणादण मतदार वाढले? असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला.
मला सत्ताधारी पक्षाला एकच सांगायचं आहे की आम्हाला कुठलाही राग नाही किंवा आसूया नाही. तुम्ही सत्ता कशी राबवता आहात आणि कशातून राबवत आहात त्याचा आम्हाला राग आहे. लोकांनी ठरवावं की कुणाला सत्तेत बसवायचं आणि कुणाला विरोधात. लोकांनी ठरवलं पाहिजे, निवडणूक आयोगाने नाही. सध्या मनमानी कारभार सुरू आहे, एकाच उद्योगपतीला विमानतळं दिली, जंगलं दिली, पोर्ट दिले. काय चाललंय काय? आम्ही काही केलं तरी फरक पडत नाही हे निवडणूक आयोगाला बांधल्यामुळे होतं आहे. या देशातल्या जनतेने काहीही बोलावं, काहीही सांगावं, निवडणूक आयोग आमच्यासह असेल तर आम्ही मनाला येईल तसं वागू. आम्हाला अमेरिकेला सरेंडर व्हायचं आहे तर होऊ, पेट्रोलचे भाव वाढवू, तुम्हाला रांगेत उभं करू. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असतो तेव्हा त्यांना भीती असते. लोकांनी मतदान केलं नाही तर आपली सत्ता जाईल, अशी कुठलीही भीती महाराष्ट्रातही नाही, केंद्रातही नाही कुठेही दिसत नाही असंही राज ठाकरे म्हणाले. यांच्या काळात फक्त एक उद्योगपती मोठा होताना दिसतो आहे. ही हिंमत आली कुठून? सगळी चॅनल्स आम्ही ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन ठेवला आहे. सत्तेतल्या कुठल्याही पक्षाने विचार केला पाहिजे की आपलं आजचं चुकीचं पाऊल, धोरण हे पुढच्या काळात पायंडा होणार का?
आज भाजपा सत्तेत आहे, उद्या दुसरा पक्ष सत्तेवर येईल. त्यांनी जर अशाच पद्धतीने सत्ता राबवायची असं ठरवेल तेव्हा तुम्ही काय कराल. दुसरे पक्ष येऊन यापेक्षा जास्त गोष्टी केल्या तर? आपण या देशाचा पायाच बदलत आहोत याचंही भान सुटलं का? लोकांवर वरंवटा फिरवून हे लोक सत्तेवर आले आहेत. आजचा मोर्चा हा त्या विरोधातला आहे असंही राज ठाकरे म्हणाले.
