राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. दरम्यान, लाड यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिवाजी महाराजांविषयी बोलताना भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान, म्हणाले “शिवरायांचा जन्म…”

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज रत्नागिरीत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रसाद लाड यांच्या विधानाबाबात विचारले असता, “शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद करत बसायचे. एवढच सध्या सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानानंतर अमोल मिटकरींचा हल्लाबोल, म्हणाले “आता नाक रगडून…”

यावेळी बोलताना, “यंदा कोकण दौऱ्यात मला लोकांच्या देहबोलीमध्ये खूप फरक जाणवतो आहे. येत्या जानेवारीमध्ये कोकणात माझ्या दोन सभा आहेत. त्यापैकी एक कुडाळ आणि दुसरी रत्नागिरी किंवा चिपळून येथे होईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पांबाबत बोलताना, “कोकणासारख्या निसर्गरम्य सारख्या भागात प्रकल्प होऊ नयेत, असं आजही वाटतं. मात्र, एकूणच सद्या महाराष्ट्राचा विचार करता, प्रकल्प बाहेर जाणे, राज्याला परवडणारे नाही. काही दिवसांपूर्वीच एक-दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. अशा स्थितीत प्रकल्पांना विरोध करणंही योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार”; संजय राऊतांचं विधान!

“लपून-छपून भुरटे कोकणात जमीन घ्यायला येतात. त्यावेळी येथील स्थानिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. जेव्हा लोकं हजारो एकर जमीन विकत घेतात, तेव्हा कोणाला संयशसुद्धा येत नाही? तेव्हा आपल्या माहिती पडतं की इथे प्रकल्प येत आहेत. त्यानंतर केंद्राचा आणि राज्याचा प्रकल्प इथे आल्यानंतर आपल्या जमीनीचे भाव मिळाले नाही, असं म्हणतो. काही गोष्टींबाबत सर्वांनी जागृत राहणे गरजेचं आहे”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सीमावादाच्या मुद्द्यावरून बोलताना, “हे सर्व जाणीवपूर्वक सुरू असून मुळ विषयांवरून तुमचे दुर्लक्ष व्हावे, या हेतूने सर्व वाद निर्माण केले जातात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य

यावेळी त्यांनी हर हर महादेव चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. “कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं, असं होऊ नये. जे लेखक, निर्माते असे चित्रपट काढतात, त्यांच्याशी किमान एकदा बोलायला हवं. मात्र, तसं न करता केवळ विरोध करायचा याला अर्थ नाही. उद्या लोकं महाराजांवर चित्रपट काढणं बंद करतील” , असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray reaction on prasad lad statement on shivaji maharaj birth place in ratnagiri pc spb
First published on: 04-12-2022 at 12:26 IST