scorecardresearch

“सम्मेद शिखरस्थळाबाबतचा निर्णय झारखंड सरकारने मागे घ्यावा”, राज ठाकरे यांची मागणी; म्हणाले, “जैन धर्माला…”

गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे.

“सम्मेद शिखरस्थळाबाबतचा निर्णय झारखंड सरकारने मागे घ्यावा”, राज ठाकरे यांची मागणी; म्हणाले, “जैन धर्माला…”
राज ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

झारखंडमधील गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला. मात्र, या निर्णयाला जैन समाजाकडून विरोध करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात देशभरात आंदोलनदेखील सुरू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून झारखंड सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच गरज पडल्यास केंद्र सरकारने यात लक्ष घालावं, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “जितेंद्र आव्हाड भूगोल विसरले का?” ‘त्या’ ट्वीटवरून चंद्रशेखर बावनकुळेंची आगपाखड; म्हणाले, “इतका नीचपणा?”

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत असून झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास केंद्र सरकारने यात त्वरित हालचाल करावी, असेही ते म्हणाले.

हा वाद नेमका काय आहे?

झारखंडमधील गिरीहीद जिल्ह्यातील पारसनाथ पर्वतावर असलेल्या श्री सम्मेद शिखरस्थळाला इको-सेंसिटिव्ह झोन घोषित केला जावा, अशी शिफारस राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये केली होती. केंद्र सरकारने २०१९ मध्ये या क्षेत्राला पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर आता झारखंड सरकारकडून हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पर्यटन स्थळाची घोषणा झाल्यानंतर याठिकाणी एका मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल झाला. जैन समाजाचे म्हणणे आहे की, पर्यटन स्थळ जाहीर झाल्यामुळे येथील पावित्र्य भंग होईल. ज्यांना जैन धर्माची आस्था नाही, ते लोकदेखील याठिकाणी येतील आणि मंदिराचे पर्यटन स्थळ होऊन जाईल. मंदिराच्या ठिकाणी मांस-मद्य प्राशन केले जाईल, अशी भीती जैन समुदायामध्ये आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 15:29 IST

संबंधित बातम्या