देवेंद्र फडणवीस मला बरा माणूस वाटायचा, आत्ता आत्तापर्यंत बरे वाटायचे मला. पण कितीही खोटं बोलत आहेत. तो अण्णा मलाई आला होता मुंबई महाराष्ट्राचं शहरच नाही तो बोलला तरीही देवेंद्र फडणवीस म्हणतात तो असं काही बोललाच नाही. किती हवं तेवढं देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत केला. तो अण्णा मलाई सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही. फडणवीस म्हणतात त्याचा तो अर्थच होत नाही. मला वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी समजतं. पण खोटं बोलत राहायचं, त्याचं खरं आता होणार नाही. असं म्हणत त्यांनी व्हिडीओही लावला आणि फडणवीस खोटं बोलत आहेत असा आरोप केला.

देवेंद्र फडणवीस तुम्ही हे सगळं कुणासाठी करत आहात?

देवेंद्र फडणवीस हे सगळं तुम्ही कुणासाठी करताय? पण काल मी म्हटलं ना की हे फक्त ससाणे आहेत, जाऊन फक्त पक्षीच मारून आणायचे आहेत यांना. मी त्या गौतम अदाणीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोंबल्या. पुढे काय सुरू केलं? माझा आणि गौतम अदाणींचा फोटो, माझ्या घरी गौतम अदाणी येऊन गेलाय, रतन टाटा येऊन गेले आहेत, मुकेश अंबानी येऊन गेले आहेत, चित्रपटातले कलाकारही येऊन गेले आहेत. मग ? माझ्या घरी येऊन गेले म्हणून यांची पापं झाकायची का मी? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

गौतम अदाणी घरी येऊन गेले आहेत मग?

गौतम अदाणी घरी आले होते काहीतरी दोन ते तीन वर्षांपूर्वी आले होते. आता घरी आले होते तर काय करु? हाकलून देऊ? शिवाय अदाणीशी दोस्ती करण्याइतका अडाणी मी नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आमचं गुजराती लोकांशी, समाजाशी भांडण नाही. जे काही डाव रचत आहेत त्या विरोधात इथल्या गुजराती समाजाने बोललं पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नवी मुंबईचा विमानतळ सोडला तर अदाणीने एकही विमानतळ बांधलेला नाही. जी विमानतळं घेतली आहेत ती सगळी गन पॉईंटवर चालवायला घेतली आहेत. पोर्टचंही तेच, गुजरातमधलं मुंद्रा पोर्ट बांधलं आहे, इतर पोर्ट गन पॉईंटवर चालवायला घेतली आहेत असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत केला.

गौतम अदाणींवरच मेहरबानी का?

गौतम अदाणी मागच्या दहा ते अकरा वर्षात श्रीमंत झाला आहे, टाटा-बिर्ला यांना हे सगळं करायला ५० ते ६० वर्षे लागली होती. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. पण एकाच उद्योगावर एवढी मेहरबानी का? हा प्रश्न विचारणारा माणूस मी आहे. मराठी शहरांवरचा ठसा यांना पुसायचा आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.