मुंबईतील दादर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांची उपस्थिती लाभली. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांना संजय राऊत अजिबात आवडायचे नाहीत, असा रंजक खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. संजय राऊत यांचा ‘सामना’च्या संपादकपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास राज ठाकरेंनी या कार्यक्रमादरम्यान सांगितला.
राज ठाकरे म्हणाले की, “संजय राऊत आणि माझे संबंध अत्यंत जुने आहेत. संजय राऊत आणि त्यांचे मित्र चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर ही जोडी अनेकदा आमच्या घरी यायची. माझे वडील श्रीकांत ठाकरे यांच्याशी राऊतांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्या काळात हे दोघेही ‘मार्मिक’साठी लेखन करायचे. श्रीकांत ठाकरेंच्या माध्यमातूनच संजय राऊत यांचा पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी संपर्क आला.”
लोकप्रभा, गँगवॉरच्या बातम्या अन् बाळासाहेबांचा राग
सामना सुरू होण्यापूर्वी संजय राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात कार्यरत होते. “त्या काळात मुंबईतील गँगवॉरवर संजय राऊत अप्रतिम आणि वास्तववादी वृत्तांकन करायचे. मात्र, त्याच वेळी ८८-८९ च्या सुमारास राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करणारे अनेक लेख लिहिले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा त्यांच्यावर राग होता. त्यावेळी बाळासाहेबांना संजय राऊत अजिबात आवडायचे नाहीत,” अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.
बाळासाहेबांची मुलाखत अन् राऊत सामनाचे संपादक
शिवसेना भवनात संजय राऊत यांनी घेतलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या एका विशेष मुलाखतीचा किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले, “मुलाखतीदरम्यान बाळासाहेबांनी संजय राऊतांना नेहमीच्या शैलीत काही शिव्याही घातल्या होत्या. विशेष म्हणजे, मुलाखत प्रसिद्ध झाली तेव्हा राऊतांनी बाळासाहेबांच्या शिव्यांसह ती जशीच्या तशी छापली! संजय राऊतांचा हा प्रामाणिकपणा बाळासाहेबांना खूप आवडला. बाळासाहेबांना त्यांच्यातील पत्रकाराचा प्रामाणिकपणा भावला आणि तिथूनच त्यांच्यातील संबंधांचे नवे पर्व सुरू झाले.”
“संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या शिव्याही खाल्ल्या आहेत आणि सामनाच्या संपादकीय पदापर्यंतचा त्यांचा संपूर्ण प्रवास मी जवळून पाहिला आहे,” असे सांगत राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला.
