Raj Thackeray On Hindi Compulsion : राज्यात पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्यात आले आहेत. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या वतीने आज (५ जुलै) विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम येथील या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न हा मुंबई वेगळी करण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल होते, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. या निर्मयाच्या माध्यमातून त्यांनी हा विषय चाचपडून पाहिला असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

सत्ताधाऱ्यांना नेमकं काय आणि कोणासाठी करायचं आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले की, “हिंदी भाषा ही दोनशे वर्षांपूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात देखील नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी आणि नेमकं काय करायचं आहे? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वातंत्र्य करता येते का याच्यासाठी अगोदर थोडंस भाषेला डिवचून बघू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा. काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गां** नाहीयोत”.

राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या निर्णय घेतल्यानंतर त्याला शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या पक्षांनी कडाडून विरोध केला. यावेळी ठाकरेंची मुले देखील इंग्रजी शाळेत शिकली आहेत, असा युक्तीवाद करण्यात आला. यावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मग आता माघार घेतली त्याचं काय करायचं? मग सगळं प्रकरण वेगळीकडे वळवा. वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? तर ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमांमध्ये शिकली… म्हणजे दादा भुसे मराठी माध्यमात शिकून शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमात शिकून मुख्यमंत्री झाले. कोण कुठे शिकलं याचा काय संबंध? कोणाकोणाची मुले परदेशात शिकत आहेत याच्या याद्या आमच्याकडे आहेत. त्याचं तुम्ही काय करणार आहात? त्यापेक्षा मंत्रिमंडळातील एका-एका मंत्र्याचं हिंदी ऐका, फेफरं येईल. हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात,” असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिले.