गुढीपाडव्याच्या बहुचर्चित सभेनंतर राज ठाकरे आज पुन्हा एकदा एक मोठी सभा घेत आहेत. या सभेत ते आपल्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेसाठी जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. अखेर राज ठाकरे यांचं आगमन झालं आणि जोरदार टोलेबाजीनेच या सभेला सुरूवात झाली. यामध्येच बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबद्दल खिल्ली उडवली आहे. माझ्या ताफ्याला अडवल्याचं इंटेलिजन्सला कळलं पण पवारांच्या घरावरच्या हल्ल्याबद्दल कळलं नाही, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.


आपल्या भाषणाची सुरूवात करताना राज ठाकरे म्हणाले,” व्यासपीठावर येताना मला अग्निशमन दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आग लावणार नाहीये. आज दुपारी मी बसलो असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला विचारलं किती वाजता निघणार आहात? म्हटलं का? तर म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही त्यांना ताब्यात वगैरे घेऊ. मी म्हटलं निघेन तेव्हा कळवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरंतर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते. तुम्ही साधे शिंकलात तरी ती शिंक साधी आहे की करोनाची हेही त्यांना माहित असतं, मग एवढी मोठी गोष्ट त्यांना कळली नाही?”

हेही वाचा – Raj Thackeray Uttar Sabha Live : “एकाच घरात राहून अजित पवारांवर रेड पडतात, मग तुमच्यावर का नाही?”, राज ठाकरेंचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल!


राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली . महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं.आक्रमक झालेले कर्मचारी अचानकपणे शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक देखील केली. शिवाय, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.