महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज (१ ऑगस्ट) मुंबईत मेळावा पार पडला आहे. या मेळाव्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसेच विविध मुद्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाने चांगलंच राजकारण तापलेलं आहे. याच मुद्यांवर बोलताना राज ठाकरे यांनी आता आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. राम मंदिरातील कथित अपहारानंतर आता मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराबाबत राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी १८ कोटींची चोरी होते’, असा दावा राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“आता मंदिरात चोरी व्हायला लागली? अयोध्येतील राम मंदिर भावनिक दृष्टया एवढं महत्वाचं स्थान असलेल्या ठिकाणी १४०० कोटींची चोरी होते? यावर सरकारमधील कोणीही व्यक्ती बोलायला तयार होत नाही. मात्र, राम मंदिरावर मतं मागायला हे लोक बरोबर जातात. पंतप्रधान मोदींनी राम मंदिरातील अपहारावर बोलायला नको का?”, असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

“सिद्धीविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप

सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिलेलं एक पत्र राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं. राज ठाकरे म्हणाले की, “महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धीविनायक न्यास मंदिर प्रभादेवी, मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब आमची संबंधित ट्रस्टमध्ये विस्वस्त म्हणून आपण नियुक्ती केली, आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मंदिराची मिळकत ३५ टक्के जादा वाढवण्यास आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. मिळकत? असो. महोदय, मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरणारे काही कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीतील रकमेची मोजदात ही ५० लाख रुपयांच्या आत होती. मात्र, हे कर्मचारी पकडल्यानंतर गेल्या तीन आठवड्यात दानपेटीतील रक्कम ही दीड कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली. याचाच अर्थ आधी दर आठवड्याला दानपेटीत जमा होणाऱ्या एकूण पैशामधून काही रक्कम लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचं मंदिराचं नुकसान होत होतं, याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत आहेत असा आमचा ठाम संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी आमची विश्वस्त मंडळाची अपेक्षा आहे”, असा पत्रातील मजकूर राज ठाकरे यांनी भाषणात वाचून दाखवला.

“हे पत्र सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाचं आहे. म्हणजे सिद्धीविनायक मंदिरातून दरवर्षी १८ कोटींची चोरी होते. आपण भाविक म्हणून तिकडे जातो, दानपेटीत दान टाकतो आणि इकडे असल्या चोऱ्या होतात. ही माणसं सगळी मंदिरे लुटत आहेत. आपले लोक किंवा विद्यार्थी परिक्षांच्या आधी किंवा नोकरीच्या दरम्यान मंदिरात जातात आणि देवाकडे श्रद्धेने मला नोकरी मिळू दे अशी मागणी करतात, पण त्याच मंदिरात आज चोऱ्या होत आहेत. मंदिरातीलच माणसं या चोऱ्या करतात. हा आमचा धर्म? ही आमच्या धर्माची मंदिरं? मग अशी जर देशाची परिस्थिती असेल तर काय होईल? मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून यावर विचार करणं गरजेचं आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.