गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम व निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात देशभरात विरोधक आंदोलने करत आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा काढण्यात आला, तर दुसरीकडे भाजपाच्यावतीने २ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ महारॅली काढण्यात आली. महाराष्ट्रात देखील भाजपाच्यावतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अशी रॅली काढण्यात आली.

सध्या काँग्रेस आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांकडून आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. याच मुद्यांवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांना सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या राजकीय कार्यपद्धतीवर आपल्या खास शैलीत मिश्कील टिप्पणी केली. ते मुंबईतील एका कार्यक्रमात आज बोलत होते.

‘सत्ता केवळ येऊन चालत नाही, ती अंगात आणि मनात असावी लागते’, असं सांगत राज ठाकरेंनी भाजपा अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर न आल्याची टीका केली. तसेच सत्तेत असूनही भाजपाने काढलेल्या मोर्च्यावर ‘म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवाव्यात तसा हा प्रकार आहे’, असं म्हणत त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली.

राज ठाकरे काय म्हणाले?

“भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे मी जेव्हा बघतो, तेव्हा मला असं वाटतं की फक्त सत्ता येऊन चालत नाही किंवा सत्तेत बसून चालत नाही, तर सत्ता तुमच्या अंगात असावी लागते. सत्ता मनात असावी लागते. पण भारतीय जनता पक्ष अजूनही विरोधी पक्षातून बाहेर आलेला नाहीये. काँग्रेसला अजूनही हे समजत नाही की विरोधी पक्ष कसा असावा. आता गेल्या पाच वर्षात काँग्रेसला समजायला लागलंय. मात्र, मला असं वाटतं की ही गोष्ट योग्य नाही. आपल्यावरचा राग, आपल्यावरचा विनोद या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत,” अशी टीका राज ठाकरे यांनी भाजपावर केली.

“आता काल भाजपाने मोर्चा काढला, आणि हेच सत्तेत आहेत. सत्तेत असणारा पक्षच मोर्चा काढत आहे की संविधान वाचवा किंवा लोकशाही वाचवा. यावर काल एका व्यक्तीने खूप छान कमेंट केली. भारतीय जनता पक्षाने लोकशाही वाचवा असं सांगणं म्हणजे म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा असं सांगण्यासारखं आहे. तुम्ही सत्तेत आहात ना? मग मोर्चे कसले काढत आहात?”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपावर संताप व्यक्त केला.