महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आज (१ ऑगस्ट) मेळावा पार पडला आहे. या मेळाव्याला मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. या मेळाव्यात राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे आदी नेते उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरण, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर व्हिडीओच्या माध्यमातून दिलेली प्रतिक्रिया, अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. ‘चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट मला पाहायचे आहेत’, अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली.

राज ठाकरे काय म्हणाले?

“आधीच्या काळात लहान असताना आई सांगायची की, रात्री झोपताना डोक्याला तेल लावत जा, म्हणजे बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपड चोपडलं. मात्र, त्याला बुद्धी आली नाही. या माणसाचा प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. काय तर हे म्हणे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आहेत. आपण काय बोलतोय, जग कुठे चाललंय? आपण काय करतोय? महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले की दिल्लीतील आंदोलनादरम्यान जे दगड फेकण्यात आले, त्या दगडावरच्या फुटप्रिंटस आधारशी लिंक केल्या जाणार आहेत. खरं तर त्यांना फिंगरप्रिंट असं म्हणायचं होतं. मग दगडावरच्या फिंगरप्रिंट आधारशी लिंक कशा होणार?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

“चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट मला बघायचे आहेत. या माणसाला ज्ञान मिळावं म्हणून कोल्हापूरकरांनी कोल्हापूरवरून पुण्यात पाठवलं, का तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. मात्र, तरीही काही उपयोग झाला नाही. आता असे शिक्षणमंत्री म्हटल्यानंतर ‘जेन झी’चा पारा चढणार की नाही? ही अशी माणसं तुम्ही आमच्या नशिबी आणून ठेवल्यावर काय होणार?”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य काय?

‘दिल्लीत झालेल्या आंदोलनावेळी दगडफेक झाली होती, त्यातील प्रत्येक दगड पोलिसांनी संकलित केले आहेत. त्यावरील बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) लवकरच ‘आधार’ कार्डशी जोडले जाणार आहेत. त्याआधारे तपास केला जाणार आहे’, असं वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आता राज ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.