पुण्यात आज झालेल्या राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता गेल्या दोन दिवसांपासून ताणली गेली होती. आज गणेश कला क्रीडा मंच येथे सभेत बोलताना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. अयोध्या दौरा स्थगित केल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला राज ठाकरेंनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. मात्र, त्याचवेळी काही दिवसांपासून सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी ओरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात बोलताना राज ठाकरेंनी यासाठी शिवसेनेलाच जबाबदार धरलं आहे.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा

यावेळी औरंगाबादच्या नामांतरावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “परवा मुख्यमंत्री म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं, नाही झालं फरक पडत नाही. मी बोलतोय ना. तू कोण आहेस? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रात सरकार होतं, आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जिवंत ठेवायचा आहे. याच गोष्टी फक्त यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं, तर प्रश्नच मिटला. मग बोलायचं कशावर? अनेक शहरांमध्ये १०-१० दिवस पाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत”, असं राज ठाकरे यावेळी सभेत बोलताना म्हणाले.

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंवर १ जून रोजी होणार शस्त्रक्रिया, पुण्यातील भाषणादरम्यान दिली माहिती!

“यांनीच एमआयएमला मोठं केलं”

दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला. एमआयएमला यांनीच मोठं केल्याचं ते म्हणाले. “यांच्या राजकारणासाठी, हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदुंविरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात औरंगाबादमध्ये एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली”, असं राज ठाकरे म्हणाले. औरंगाबादचं लवकराच लवकर संभाजी नगर हे नामांतर करून यांचं राजकारण एकदा मोडीत काढून टाका अशी विनंती मी पंतप्रधानांना करत असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Pune Speech : “निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा”, राज ठाकरेंचा शरद पवारांवर नाव न घेता टोला!

“शिवसेनेचा औरंगाबादमधला खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो विस्तार करायला आला होता. मग काय शिवाजी महाराज त्याच्या रस्त्यात गेले का?” असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.