मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (३ नोव्हेंबर) मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावर एक पोस्ट शेअर केली होती, त्यावरून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकातील २८ विधानपरिषद जागांच्या निवडणुकीचा उल्लेख करत काँग्रेसला किती जागा मिळाल्या? असा सवाल करत मोदींनी एक पोस्ट शेअर केली होती.

यावरच बोलताना आता राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपावर खोचक टीका केली. ‘आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी विधानपरिषदेच्या स्थानिक निकालांवर अशी प्रतिक्रिया दिली नव्हती’, असं राज ठाकरेंनी म्हटलं. “आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांनी अशा प्रकारे विधानपरिषदेच्या निकालावर कुठली कॉमेंट पास केली असं मला आठवत नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“आता दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार किंवा आणखी काही ठिकाणी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या निकालाबाबत आधी सांगितलं की, काँग्रेसची एकही जागा जिंकून आली नाही, सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या वैगेरे. यावर लगेच देशाचे पंतप्रधान ट्विट करतात? विधानपरिषदेच्या काही जागांची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीचा निकाल आहे. त्यावर पंतप्रधान ट्विट करतात?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

“आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले आहेत, पण मला आजपर्यंत आठवत नाहीये की त्यांनी अशा प्रकारे किमान प्रतिक्रिया तरी दिली असेल. समजा तेव्हा ट्विटर वैगेरे नसेल, म्हणून त्यांनी वृत्तपत्रात तरी प्रतिक्रिया दिल्या आहेत असंही मला आठवत नाही. अशा शुभेच्छा कधीच कोणत्याही पंतप्रधानांनी दिल्या नाहीत. पण मोदींनी का दिल्या? कारण भाजपा अजूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेर आलेली नाही”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

‘तुम्ही सत्तेत आहात ना? मग मोर्चे कसले काढता?’

“भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे मी जेव्हा बघतो, तेव्हा मला असं वाटतं की फक्त सत्ता येऊन चालत नाही किंवा सत्तेत बसून चालत नाही, तर सत्ता तुमच्या अंगात असावी लागते. सत्ता मनात असावी लागते. पण भारतीय जनता पक्ष अजूनही विरोधी पक्षातून बाहेर आलेला नाही. काँग्रेसला अजूनही हे समजत नाही की विरोधी पक्ष कसा असावा. पण गेल्या पाच वर्षात काँग्रेसला समजायला लागलंय”, असं राज ठाकरे म्हणाले.

“आता काल भाजपाने मोर्चा काढला आणि सत्तेतही हेच आहेत. सत्तेत असणारा पक्षच मोर्चा काढत आहे की संविधान वाचवा किंवा लोकशाही वाचवा. यावर काल एका व्यक्तीने खूप छान प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षाने लोकशाही वाचवा असं सांगणं म्हणजे म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा असं सांगण्यासारखं आहे. तुम्ही सत्तेत आहात ना? मग मोर्चे कसले काढत आहात?”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपाला सुनावलं.

मोदींनी काय पोस्ट केली होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निकालांवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर करत काँग्रेसच्या कामगिरीवर सवाल उपस्थित केले होते. “उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील २८ विधान परिषद जागांसाठी निवडणुका पार पडल्या. विशेष म्हणजे या निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेतल्या गेल्या होत्या. अंदाज लावा, काँग्रेसने यापैकी किती जागा जिंकल्या असाव्यात?”, अशी पोस्ट मोदींनी केली होती.