MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन करण्यात आलेली पोस्ट ही मनसेचे या पुढील लक्ष्य काय असणार याचे संकेत देणारी आहे. ‘महाराष्ट्र नेक्स्ट’, ‘महाराष्ट्र पुढचा’ या टॅग लाईनने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आगामी प्रवास राहणार असे संकेत या पोस्टमधून देण्यात आले आहेत, यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

९ मार्च रोजी काय म्हणाले होते राज ठाकरे?

९ मार्च रोजी मनसेचा २० वा वर्धापन दिन पार पडला. त्यावेळी राज ठाकरेंनी मला जे काही बोलायचं आहे ते मी एकदम गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन असं म्हटलं होतं. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार?याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरेंशी युती केल्यानंतर राज ठाकरेंचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा या टॅग लाईने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कष्टकरी, शेतकरी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. चाकरमानी आणि उद्योजकांनाही सोबत घेण्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. तसेच तरुण पिढी, विद्यार्थी आणि कॉर्पोरेट्समध्ये जॉब करणारी तरुणाई दाखवण्यात आली आहे. या सर्वांना सोबत घेऊन नव्या पिढीचा नव्या युगाचा पुढचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा जणू संकल्प मनसेने मराठी नववर्षाच्या निमित्ताने घेतल्याचे दिसत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला आलेले अपयश मागे सारून नवी गरुडझेप घेण्याचेती तयारी पक्षाची असल्याचे या पोस्टमधून जाणवतं आहे. या पोस्टची चर्चाही रंगली आहे.

महाराष्ट्रातील सर्वजनतेला सोबत घेऊन जाण्याचा संकल्प आजच्या मेळाव्यात मनसेकडून होणार असे संकेत या पोस्टमधून देण्यात आले आहेत. यानंतर आता राज ठाकरे प्रत्यक्ष मेळाव्यात काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसह आज शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या मातोश्री, पत्नी शर्मिला आणि मुलगी उर्वशी उपस्थित होत्या. यानंतर शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मनसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. आज राज ठाकरे जे भाषण करतील ते ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक दाखल होत आहेत.