Raj Thackeray on R Madhavan and Vivek Oberoi Dubai Shift: “जंतर-मंतर आणि देशभरात तरुणांनी जे आंदोलन केले, त्यामागे नीट पेपरफुटीचे प्रकरण होतेच. पण त्याशिवाय केंद्र सरकारच्या १२ वर्षांतील कारभाराबद्दलचा रागही होता”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत असताना त्यांनी विद्यार्थी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची तळी उचलणारे कलाकार स्वतः विदेशात जाऊन का राहत आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली.

लाखो भारतीय विद्यार्थी देशाबाहेर का जात आहेत?

भारतातील शैक्षणिक व्यवस्था कमकुवत आणि दर्जाहीन झाली असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी दरवर्षी भारतातून विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी दिली.

राज ठाकरे म्हणाले, “देशातील एक लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. १५ हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, २००४ मध्ये आठ लाख शिक्षकांची पदे रिक्त होती. २०२६ मध्ये ही संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. २०१४ साली ३ लाख विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी गेले होते. २०२६ मध्ये ही संख्या ९ लाख १० हजारांवर पोहोचली आहे. इतकी मुले विदेशात का जात आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.”

२०१४ साली राज ठाकरेंनी तयार केलेल्या डॉक्युमेंटरीचा उल्लेख केला. ही डॉक्युमेंटरी यूट्यूबवर असून ती पाहावी, असेही आवाहन त्यांनी केले. या माहितीपटात त्यांनी भारतीय विद्यार्थी विदेशात जाण्याचे कारण सांगितल्याचे म्हटले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “भारतातील मुले विदेशात जातात कारण तिथे मिळणारे सभोवतालचे वातावरण. घरातून बाहेर पडल्यानंतर मला आनंद मिळायला हवा. सुंदर रस्ते, चांगल्या बागा, मैदाने, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा प्रत्येक बाबीला विदेशात वाव आहे. आज ग्रामीण भागात कित्येक कलाकार, खेळाडू आहेत. पण त्यांना वावच नाही. पुढे काय करायचे त्यांना काहीच माहीत नाही. हे सर्व जे साचलेपण आहे, ते तरुणांच्या आंदोलनातून बाहेर येत आहे. नीट पेपरफुटीचा राग आहेच. पण बाकीच्या विषयांचा राग यानिमित्ताने बाहेर येतो आहे.”

शिक्षणासाठी भारतीयांचा लाखो कोटींचा चुराडा

२०१४ साली जे विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात गेले त्यांनी ८९,५०० कोटी रुपये खर्च केले. आज हा खर्च वाढून पाच लाख ८५ हजार कोटींवर गेला आहे. याचा अर्थ या मुलांच्या आई-वडिलांनी इतका पैसा विदेशात पाठवला. हजारो उद्योगपती आपला बोजा-बिस्तरा गुंडाळून विदेशात गेले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

आर. माधवन, ओबेरॉय दुबईत का?

“ज्यांनी मोदींवर चित्रपट काढला आणि त्यात मोदींची भूमिका ज्याने केली, तो अभिनेता विवेक ओबेरॉयही दुबईत राहायला गेला आहे. तो दुबईचा नागरिक आहे. मोदीजी खूप चांगले काम करत आहेत, मोदीजींनी देशाला मोठे केले आहे, अशी मुक्ताफळे ज्याने उधळली, तो धुरंधर चित्रपटामधील आर. माधवनही दुबईत राहतो. यांना जर देशातल्या पंतप्रधानांबाबत विश्वास आहे. तर हे लोक परिवारासकट दुबईत जाऊन का राहत आहेत?”, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली.

Ruchika Singh Apology Video Jantar Mantar
जंतर-मंतरवर पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीनं मागितली माफी; म्हणाली, ‘मी फक्त १५ वर्षांची आहे’

“हे लोक इथे येऊन सरकारच्या प्रायोजित चित्रपटात काम करणार आणि मग इथून पुढे परत दुबईत जाऊन राहणार. भारतात सर्व काही चांगले आहे, असे सांगून हे स्वतः दुबईला निघून जाणार. सेलिब्रिटीच असे वागत असतील तर आपण विद्यार्थ्यांना काय सांगणार?”, असेही राज ठाकरे म्हणाले.