आज प्रशांत कुलकर्णी यांच्या हास्यरेषा या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्ताने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर होते. राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं. आशिष शेलार भाषणात म्हणाले की राज ठाकरेंनी बोलवलं की देवेंद्र फडणवीस नेहमी येतातच. हा संदर्भ घेऊन राज ठाकरेंनी आपल्या शैलीत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

२०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं-राज ठाकरे

आशिष शेलार आत्ता म्हणाले की राज ठाकरेंनी बोलवलं की मुख्यमंत्री येतातच. मी यापुढेही मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन आणि ते येतील २०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. असं राज ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले आणि एकच हशा पिकला. आता मी काय सांगू? असंही राज ठाकरे म्हणाले. ग्रंथालीतर्फे प्रशांत कुलकर्णी यांच्या हास्यरेषा या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे यांनी दिलखुलास भाषण केलं.

मी स्वतः बाळासाहेब ठाकरेंवरचं पुस्तक केलं आहे-राज ठाकरे

आज या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे. हास्यरेषा हे प्रशांत कुलकर्णींचं पुस्तक आहे. ग्रंथालीतर्फे त्यांचं प्रकाशन केलं गेलं आहे. एक पुस्तक बनवायचं आणि त्याचे संदर्भ गोळा करायचे हे सोपं काम नाही. मी स्वतः बाळासाहेब ठाकरेंवर फोटोबायोग्राफीचं पुस्तक केलं होतं. ते पुस्तक तयार करताना काय त्रास होतो ते मला माहीत आहे असं राज ठाकरे म्हणाले. तुम्ही जर बाळासाहेब ठाकरेंचं पुस्तक पाहिलंत तर तुम्हाला तो आलेख दिसतो. प्रशांत कुलकर्णींनी हास्यरेषा पुस्तकासाठी तशीच मेहनत घेतली आहे हे दिसून आलं. इतके संदर्भ गोळा करायचे आणि इतकी व्यंगचित्रं गोळा करायची हे सोपं नाही. मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी सांगितली पहिल्या व्यंगचित्राची आठवण

माझं पहिलं व्यंगचित्र मार्मिकमध्ये छापून आलं. तेव्हा मी व्यंगचित्र करत नव्हतो, मी शाळेत होतो. मार्मिकचं मधलं पेज त्याला जत्रा म्हणायचे. मधली दोन चित्रं माझे वडील करायचे, मुखपृष्ठ बाळासाहेब ठाकरे करायचे. नंतर मग आतली दोन चित्रंही बाळासाहेब करायचे. जत्राचं स्केच बाळासाहेब करायचे मग इकिंगला माझ्या वडिलांकडे यायचं. मी एकदा शाळेतून घरी आलो, त्यादिवशी वडील मला म्हणाले की अरे काकाने तुझ्यासाठी व्यंगचित्र करून पाठवलंय इकिंग कर. तेव्हा मी इकिंग केलं होतं. बाळासाहेब मला लाडाने टिनू म्हणायचे. त्या वेळच्या व्यंगचित्राचं शीर्षक होतं की आमच्या टिनूने काढलेलं व्यंगचित्र ते माझं पहिलं व्यंगचित्र अशी आठवणही राज ठाकरेंनी भाषणात सांगितली.

मी तीन वर्षे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये तीन वर्षे शिकलो, मी त्यानंतर कॉलेज सोडलं. पण मी निवडणुकीला उभा राहू शकतो. कारण पदवीधर निवडणुकीला उमेदवार पदवीधर हवा असं काही नाही. या देशाची लोकशाही यासाठीच आहे. मला प्रमोद नवलकरांनी फॉर्म दाखवला होता, पदवीधर उमेदवाराचा त्यात लिहिलं होतं उमेदवाराची सही किंवा अंगठा. तो फॉर्म हेच एक व्यंगचित्र होतं असंही राज ठाकरे म्हणाले.