MNS Gudhi Padwa Melava 2026 : मुंबईमधील शिवतीर्थ मैदानावर दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक दाखल झाले होते. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ‘भविष्यात सत्ता हातात घेणार म्हणजे घेणार’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“आज आपल्या पक्षाला २० वर्ष पूर्ण झाले आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे आज २० वर्षांनंतर १९ मार्चला गुढीपाडवा यावा, याला मी शुभसंकेतच मानतो. निवडणुका आल्या आणि गेल्या. सिमगा झाला, सगळं झालं. मात्र, आपण जे उभे आहोत ते महाराष्ट्रासाठी उभे आहोत. मी आता जे बोलत आहे ते तुमच्या टाळ्या मिळाव्या म्हणून बोलत नाही. मी तुम्हाला जो शब्द दिला आहे, या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची आहे, ती सत्ता भविष्यात आपण हाती घेणार म्हणजे घेणार, हा माझा आत्मविश्वास आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘इन्स्टाग्रामधून बाहेर या…’, राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन

“बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की काय बोलतोस ते महत्त्वाचं नाही, तू आज त्यांना काय दिलंस ते महत्त्वाचं आहे. समोरच्यांना विचार करायला काय दिलंस? माझ्यावर दडपण असतं की नवीन काय देऊ तुम्हाला? हे सरकार विचार करायला लागेल. आज तुम्हाला, संपूर्ण देशाला करमणुकीत गुंतवून ठेवलं. आयपीएल सुरु आहे. कुठले कुठले पिक्चर येत आहेत. मी आज तुम्हाला नम्र विनंती करणार आहे, पहिल्यांदा मोबाइलच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या. मध्यंतरी रिलबाज वगैरे आले होते. गुंतायला होतं त्यात. डान्सबार झाले त्याची लक्षणं आहेत तिथे नोटा उधळणं बंद झालं इथे हे सुरु झालं. तु्म्हाला गुंतवून ठेवायचं आणि सरकारला प्रश्न विचारु नयेत यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात नाही जगभरात सुरु आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“आतापर्यंत तीनवेळा शेतकरी कर्जमाफी झाली, तरीही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत कुणालाही काहीही पडलेलं नाही. कोस्टल रोडचं कौतुक मराठी माणूसच करतो आहे. हा रस्ता तुमच्यासाठी तयार झालेला नाही, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि इतरांना आत घेण्यासाठी हा रस्ता तयार झाला आहे, अदाणींसारखे उद्योजक सगळं घेत आहेत, सरकारचं लक्ष नाही. महाराष्ट्र म्हणून आपण आपली ओळख गमावून बसतो आहोत. मी अनेकदा काही व्हिडीओ पाहतो, आपलेच मराठी लोक ओरडून सांगत असतात हिंदी मत बोलो, तू काय करतोय? तू हे त्याला हिंदीतच सांगतो. तमिळनाडू, कर्नाटक बघा, गुजरात बघा”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘आपण इराणला साथ द्यायला हवी होती’, मध्य पूर्वेतील युद्धावर राज ठाकरेंचं भाष्य

राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करत देशावर ओढवलेल्या एलपीजी गॅशच्या टंचाईवर बोट ठेवले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी उशीर केला, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे म्हणाले, “देशात आज धाकधूक असून भीषण परिस्थिती आहे. नेहमी नॉर्मलवर असणारे लोक सध्या गॅसवर आहेत. काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता. त्या इराणवर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, ते पाहता आपण इराणला साथ द्यायला हवी होती”, असं राज ठाकरे म्हणाले.