मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा ४ ऑक्टोबरला निघणार आहे. हा मोर्चा भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास कंपनी ते मुंबई महापालिका इथपर्यंत निघणार आहे. सकाळी १० वाजता मोर्चाला सुरूवात होईल. त्यानंतर ११ ते ११.३० च्या दरम्यान मुंबई महापालिकेच्या जवळ या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे.

राज ठाकरेंचा भाजपाला टोला

निवडणूक आयुक्तांबाबत जे काही सांगितलं जातं आहे ते कपोलकल्पित आहे असं भाजपाने म्हटलं आहे. दरम्यान याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता राज ठाकरे म्हणाले आम्ही जर का निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत असू तर मग भाजपाला काय त्रास होतो आहे? मराठीत एक म्हण आहे खाई त्याला खवखवे असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे. तसंच मोर्चाच्या दिवशी इतर कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल. तिरंगा घेऊन आम्ही सगळे मोर्चात सहभागी होऊ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी आणखी काय माहिती दिली?

मोर्चात काय बोलणार आहोत ते आम्ही बोलणार आहोतच. पण हा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे. २०१७ आणि २०१८ मध्येही मी अनेक नेत्यांना भेटलो होतो. ईव्हीएमच्या संदर्भातही मी चर्चा केली होती. ४ ऑक्टोबरला याबाबतची सगळी सविस्तर भूमिका आम्ही मांडू. ४ ऑक्टोबरच्या मोर्चानंतर पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू. सर्वच राजकीय पक्षांना आम्ही या मोर्चासाठी आमंत्रण देत आहोत. उद्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांनाह जरी या व्यासपीठावर यायचं असेल तर ते येऊ शकतात. हा कुठलाही राजकीय पक्षाच्या विरोधापेक्षा निवडणूक आयोगाचा जो काही गेल्या वर्षांतला कारभार आहे त्याविरोधातला मोर्चा आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

विविध प्रकारचे मोर्चे यापुढेही होतील-राज ठाकरे

आम्ही पत्रक काढणार नाही, पण पण प्रत्येक पक्षाला फोन करून मोर्चामध्ये या हे आम्ही सांगणार आहोत. २ ऑक्टोबरला मोर्चा होतो आहे. त्यानंतर ४ तारखेला आमचा मोर्चा होतो आहे. त्यापुढेही लोक रस्त्यावर येतील. सरकारला आणि निवडणूक आयोगाला याबाबत उत्तर द्यावं लागेल. देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा विषय असल्याने या मोर्चात कुठाही झेंडा नसेल. ज्यांच्याकडून जी गोष्ट निवडणूक आयोगाच्या विरोधात करायची असेल तर ती त्यांनी करावी. हा काही स्पर्धेचा विषय नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बाकी सगळं सविस्तर बोलणं आम्ही ४ ऑक्टोबरला करणार आहोत.