संजय राऊत यांच्या बोधकिर्तन या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत पार पडलं. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक खास किस्सा सांगितला. संजय राऊत हे सुरूवातीला लोकप्रभा या साप्ताहिकात काम करायचे. त्यावेळी ते शिवसेनेवर टीका करायचे. बाळासाहेबांना संजय राऊत सुरूवातीला आवडायचे नाहीत. तरीही बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुलाखत दिली होती. त्यावेळी काय घडलं होतं ते राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“संजय राऊत आणि माझी चांगलीच मैत्री होती, मी लोकसत्तेसाठी तेव्हा फ्रि लान्स व्यंगचित्रं काढत असे. तेव्हा त्याच्या आणि माझ्या गप्पा व्हायच्या. १९८८-८९ च्या दरम्यान सामना पेपर सुरू झाला. तेव्हा मला संजय म्हणायचा की संपादक बाळ ठाकरे असं वरती लिहिलेलं आहे तरी ही कुठली भाषा आहे? एवढी मिळमिळीत? बाळासाहेबांच्या वर्तमान पत्राला अशी भाषा शोभते का? असं बोलणं सगळं चालायचं. १९९२ ची गोष्ट असेल, त्या दरम्यान त्याने शिवसेनेवर टीका करणारे लेख लिहिले. त्यामुळे त्यावेळी बाळासाहेबांना राऊत आवडाचे नाहीत. हे सांगत राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या मुलाखतीच्या वेळी काय घडलं होतं तो किस्सा सांगितला.

बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीत काय घडलं?

“१९९२ ला मला संजयने विचारलं बाळासाहेब लोकप्रभेसाठी मुलाखत देतील का? मी म्हटलं मला माहीत नाही. तुझं रेप्युटेशन फार आहे त्यांच्याकडे. तरीही मी विचारतो. मी बाळासाहेबांना विचारलं. मग बाळासाहेबांनी तेव्हा चार वेगवेगळ्या अक्षरातल्या वेगळ्या शिव्या दिल्या मला म्हणाले मला त्याचं (संजय राऊत) तोंडही बघायचं नाही. मी म्हटलं अरे काका एकदा भेटून तर घे. चांगली मुलाखत होईल. एक दिवस ते मुलाखत द्यायला तयार झाले. शिवसेना भवनात मी, संजय राऊत आणि बाळासाहेब होतो. त्याने प्रश्न विचारायला सुरूवात केली. बोलता बोलता असे काही वेडेवाकडे प्रश्न विचारायला सुरूवात केली की मुलाखतीच्या दरम्यान बाळासाहेबांनी त्याला (संजय राऊत) शिव्या दिल्या. रेकॉर्डेड आहेत हां.” असं राज ठाकरे म्हणाले जेव्हा एकच हशा पिकला.

ती मुलाखत प्रसिद्ध झाली आणि…

यानंतर राज ठाकरे म्हणाले, “सगळं झालं त्यानंतर ती मुलाखत प्रसिद्ध झाली. त्या मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिलेल्या शिव्यांसकट मुलाखत होती. ही गोष्ट बाळासाहेबांना आवडली. ते थेट म्हणाले नाहीत पण भावना हीच होती की बंदे मे दम है. जो स्वतःवर विनोद करू शकतो, जो स्वतःच्या शिव्या लोकांना सांगू शकतो मला वाटतं त्याच्यापेक्षा प्रामाणिक माणूस नसतो. मग एक दिवस संजयला बाळासाहेबांनी बोलवलं. उद्धवबरोबर भेट करून दे मला सांगितलं होतं. मग त्यांची भेट, १९९२ ला संजय राऊत सामनाचा संपादक झाला. तो माझ्या वडिलांकडे यायचा तेव्हापासून संजय राऊत सामनाचा संपादक झाला तो प्रवास माझ्या डोळ्यांसमोरचा आहे.” असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.