Raj Thackeray Remark on Mira Road incident at Victory Rally : मराठी जनतेचा रोष पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी भाषा सक्तीचा व त्रिभाषा सूत्रासंबंधीचा शासन निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व शिवसेनेने (ठाकरे) आज विजयोत्सव साजरा केला. मुंबईतील वरळी येथे दोन्ही पक्षांनी विजयी मेळावा घेतला. दोन्ही पक्षांचे प्रमुख राज व उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. दरम्यान, मीरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा करत शहरातील अमराठी व्यापाऱ्यांनी नुकताच बंद पुकारला होता. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे म्हणाले, “हिंदी भाषेच्या सक्तीबाबतचा निर्णय सरकारने मागे घेतला असला तरी पुढच्या काळात हे सत्ताधारी आपल्याला जाती-जातीत विभागण्याचा प्रयत्न करतील. काल मीरा-भाईंदर येथे कुठल्यातरी व्यापाराच्या कानशिलात लगावण्यात आली. त्या व्यापाऱ्याच्या कपाळावर लिहिलं होतं का की तो गुजराती आहे म्हणून, मात्र काही हिंदी वृत्तवाहिन्या ‘गुजराती व्यापाऱ्याला मारलं’, अशा बातम्या पसरवू लागले. मुळात बाचाबाची झाली तेव्हा तो गुजराती निघाला, मारणारा मराठी निघाला एवढीच घटना होती. त्यावरून अशा बातम्या देण्याची आवश्यकता नव्हती.”

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणाले, “मी पुन्हा एकदा सांगतोय, अजून काहीच केलेले नाही. त्यांना (मुंबईतील अमराठी लोक) मराठी भाषा बोलता आली पाहिजे यात काहीच वाद नाही. परंतु, विनाकारण उठसूट कोणालाही मारामारी करायची गरज नाही. कोणी जास्त नाटकं केली तर त्याच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. मात्र, चूक त्यांची असली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही जे काही कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. त्यांच्या त्यांच्यातच सगळं काही कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नाही की ‘मी मारलं म्हणून’. मार खाणारा सांगतो, ‘मला मारलं, मला मारलं’, त्यांचं त्यांना सांगू देत, याचा अर्थ असा नाही की उठसूट कोणालाही मारायचं. त्यांना मराठी आली पाहिजे, मात्र कोणालाही उठसूट मारण्याचं कारण नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंचा मराठी जनतेला एकजुटीचा संदेश

राज ठाकरे म्हणाले, “सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे. पुढे काहीही घडू शकतं. त्यामुळे मला वाटतं की ही मराठीसाठीची आपली एकजूट कायम राहायला हवी.”